
भाई नेरूरकर चषक राज्य खो-खो : ठाणे, सातारा व मुंबई उपनगर यांचीही आगेकूच
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
इचलकरंजी : भाई नेरूरकर चषक राज्य खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत धाराशिव, सांगली, कोल्हापूर व पुणे या संघांनी प्रत्येकी तीन गटात उपांत्य फेरी गाठली आहे. ठाणे, सातारा व मुंबई उपनगरने प्रत्येकी एका गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने इंचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्रमांक २१च्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत किशोर गटात सांगली, सातारा, धाराशिव व कोल्हापूर तर किशोरी गटात पुणे, धाराशिव, ठाणे व सांगली यांनी उपांत्य फेरी गाठली.

पुरुष गटात पुणे, कोल्हापूर, मुंबई उपनगर व सांगली तर महिला गटात धाराशिव, कोल्हापूर, ठाणे व पुणे यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेचा समारोप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते गुरुवारी (२७ मार्च) सायंकाळी अंतिम सामने संपल्यानंतर होणार आहे.
सांगलीने मुंबईला नमविले
महिला गटात पुणे संघाने नाशिक संघाला १६-१५ असे एका गुणाने नमविले. मध्यंतरास नाशिक संघाने १०-९ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र पुण्याच्या प्रियांका इंगळे हिने (१.४०, २.३० व ६ गुण) हिने अष्टपैलू कामगिरी करत विजय खेचून आणला. नाशिककडून प्रगती भोपे हिने (७ गुण) हिने लढत दिली.
पुरुष गटात मुंबई उपनगर संघाने ठाणे संघास १६-१५ असे एका गुणाने हरविले. मुंबई उपनगरकडून ओंकार सोनवणे (२.१०,१.३० मि. व ५ गुण) तर ठाणेकडून राज संकपाळ (१.३० मि. व ३ गुण) यांनी कामगिरी केली. निर्धारित वेळेत १६-१६ अशी बरोबरी झाल्यानंतर जादा डावात सांगलीने मुंबईवर २८-२६ अशी दोन गुणांनी मात केली. मुंबईकडून वेंदात देसाई (६ गुण व तीन डावात प्रत्येकी १ मिनिटे संरक्षण) व सांगलीकडून अभिषेक केरीपाळे (१.१०, १ मि. व ७ गुण) यांनी अष्टपैलू कामगिरी केली.
अन्य निकाल : पुरुष गट : कोल्हापूर विजयी विरुद्ध सोलापूर २१-१८, पुणे विजयी विरुद्ध अहिल्यानगर १४-११.
महिला गट : धाराशिव विजयी विरुद्ध सांगली १०-७, कोल्हापूर विजयी विरुद्ध सोलापूर १८-९, ठाणे विजयी विरुद्ध मुंबई १९-१३.
असे होणार उपांत्य सामने
किशोर गट : सांगली विरुद्ध सातारा, धाराशिव विरुद्ध कोल्हापूर
किशोरी गट : पुणे विरुद्ध धाराशिव, ठाणे विरुद्ध सांगली
पुरुष गट : पुणे विरुद्ध कोल्हापूर, मुंबई उपनगर विरुद्ध सांगली
महिला गट : धाराशिव विरुद्ध कोल्हापूर, ठाणे विरुद्ध पुणे