जळगावच्या दिनेश बागडेला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

  • By admin
  • March 26, 2025
  • 0
  • 89 Views
Spread the love

मुंबईच्या विक्रमसिंह अधिकारी याने पटकावले कांस्य पदक 

खेलो इंडिया पॅरा गेम्स 

नवी दिल्ली : रेल्वे अपघातात डावा पाय गमविल्यानंतरही जिद्दीने खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिनेश बागडे याने सुवर्णपदकाचे स्वप्न साकार केले. ४६ वर्षीय विक्रमसिंह अधिकारी याने पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. नेमबाजीत महाराष्ट्राला तिसरे स्थान प्राप्त केले आहे. 

अ‍ॅथलेटिक्स पाठोपाठ पॉवरलिफ्टिंगमध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले आहे. या स्पर्धेत २ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य अशी एकूण ५ पदके महाराष्ट्राने पटकावले. गत स्पर्धेत २ रौप्य व २ कांस्य अशी महाराष्ट्राची कामगिरी होती. 

जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरातील सभागृहात संपलेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत जळगावच्या दिनेश बागडेने महाराष्ट्रासाठी शेवटचे पदक जिंकून सुवर्ण सांगता केली. १०७ किलो गटात गुजरात, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या स्पर्धेकांनी मागे टाकून दिनेश बाजी मारली. पहिल्या फेरीपासून दिनेश आघाडीवर राहिला. तिसर्‍या फेरीत सर्वाधिक १५७ किलो वजन पेलून त्याने सोनेरी कामगिरीची नोंद केली. १४९ किलो वजन उचलून गुजरातच्या दिव्येश लडानी याने रौप्य, दिल्लीच्या जोगिंदरसिंग याने कांस्य पदकाची कमाई केली.

जळगावमध्ये रेल्वेने प्रवास करीत असताना मोबाईल विक्रेत्याचा धक्का लागल्याने  दिनेश बागडेे डावा पाय रूळाखाली आला होता. गुडघ्यापासून पायाचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर तो तब्बल ३ वर्ष तणावग्रस्त होता. अखेर कृत्रिम पाय बसविल्यानंतर अमळनेरमधील व्यायामशाळेत त्याला पॉवरलिफ्टिंग खेळामुळे संजीवनी लाभली. अत्याधुनिक सुविधा नसतानाही त्याने गत स्पर्धेत कांस्य पदकापर्यंत मजल मारली होती. वर्षभरातच कसून सराव करीत त्याने सोनेरी यशाचा पल्ला दिल्लीत पार केला. हे यश मला आंतराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रेरणा देणारे असून मला प्रोत्साहित करणार्‍या माझी मुलगी मिताश्रीला हे पदक मी अर्पित करीत असल्याचे दिनेश बागडेेने सांगितले.

पॅरालिम्पिकपटू असणार्‍या मुंबईच्या विक्रमसिंह अधिकारी याने पॉवरलिफ्टिंगमध्ये ७२ किलो गटात कांस्य पदक पटकावले. १६२ किलो वजन पेलत विक्रमने वयाच्या ४६ व्या वर्षी पदक जिंकण्याची करिश्मा घडविला आहे. पोलियोमुळे दोन्ही पायाने अधू असणार्‍या विक्रमसिंहचे हे खेलो इंडिया स्पर्धेतील पहिले पदक आहे. कॅन्सरमुळे आईचे निधन झाल्यानंतर हलाखीचे जीवन असतानाही विक्रमसिंहने हार मानली नाही. राष्ट्रीय, आशियाई स्पर्धा विक्रमसिंह याने खेळल्या आहेत.

नेमबाजीत महाराष्ट्राने २ सुवर्ण व १ रौप्य पदक जिंकून तिसरे स्थान प्राप्त केले. महाराष्ट्रासाठी स्वरूप उन्हाळकर व सागर कटाळे याने सुवर्णपदक जिंकली. सर्वसाधारण तृतीय विजेतेपदकाचा करंडक स्वरूप उन्हाळकरासह प्रशिक्षिका नेहा साप्ते, व्यवस्थापक विक्रम शिंदे यांनी स्वीकारला. नेमबाजीत राजस्थानने सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *