
राजस्थान रॉयल्स संघावर ८ विकेटने विजय, क्विंटन डी कॉकची नाबाद ९७ धावांची खेळी निर्णायक
गुवाहाटी : गतविजेत्या केकेआर संघाने राजस्थान रॉयल्स संघावर आठ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. आयपीएल स्पर्धेच्या १८व्या हंगामातील केकेआर संघाचा हा पहिला विजय आहे. पहिल्या सामन्यात त्यांना आरसीबी संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. क्विटन डी कॉक याने (नाबाद ९७) शानदार फलंदाजी करत संघाच्या विजयाचे खाते उघडले.
केकेआर संघासमोर विजयासाठी १५२ धावांचे आव्हान होते. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना थोडी मदत करणारी ठरत असल्याने फलंदाजांना सहजपणे धावा काढणे सोपे जात नव्हते. मोईन अली (५) व कर्णधार अजिंक्य रहाणे (१८) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर क्विंटन डी कॉक याने आक्रमक अर्धशतक ठोकत संघाला विजयपथावर आणले.

मोईन अली याला थेट सलामीवीर म्हणून बढती देण्यात आली. परंतु, तो लवकर धावबाद झाला. त्यानंतर रहाणे याने एक षटकार व एक चौकार ठोकून पहिल्या सामन्यातील आक्रमक खेळीची आठवण करुन दिली. परंतु, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रहाणे याने आपली विकेट गमावली. हसरंगाच्या गोलंदाजीवर तुषार देशपांडे याने त्याचा सुरेख झेल टिपला.
क्विंटन डी कॉक याने बहारदार फलंदाजी करुन सामना गाजवला. त्याने अवघ्या ६१ चेंडूत नाबाद ९७ धावा फटकावल्या. त्याचे शतक केवळ तीन धावांनी हुकले. त्याने आपल्या शानदार खेळीत आठ चौकार व सहा षटकार ठोकले. अंगकृष रघुवंशी याने नाबाद २२ धावांचे योगदान देत त्याला सुरेख साथ दिली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ८३ धावांची भागीदारी करुन संघाला १७.३ षटकात आठ विकेटने सामना जिंकून दिला. हसरंगा याने ३४ धावांत एक गडी बाद केला.
आक्रमक फलंदाज ठरले अपयशी
कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत राजस्थान रॉयल्सला १५१ धावांवर रोखले. संघातील मोठी नावे फारशी प्रभाव पाडण्यात अपयशी ठरली, संजू सॅमसन (१३), रियान पराग (२५) आणि यशस्वी जयस्वाल (२९) हे क्रीजवर स्थिरावल्यानंतरही त्यांच्या डावाचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात अपयशी ठरले. केकेआर संघाच्या फिरकीपटूंनी संपूर्ण सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखले.
प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांनी राजस्थान रॉयल्सच्या डावाची सुरुवात केली. दोघांनीही स्थिर सुरुवात केली. चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर वैभव अरोराने संजूला बाद करून सामन्यातील पहिली विकेट घेतली. संजूने जयस्वालसोबत पहिल्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. यानंतर, रियान पराग यानेही जलद सुरुवात केली पण तो आपला डाव मोठा करू शकला नाही. वरुण चक्रवर्ती याने त्याला झेलबाद केले. परागने १५ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. त्यानंतर, मोईन अलीने केकेआरसाठी यशस्वी जयस्वालच्या रूपात पदार्पणाची विकेट घेतली. यशस्वी २४ चेंडूत २९ धावा करून बाद झाला.
राजस्थानकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक ३३ धावा केल्या. त्याच्याशिवाय नितीश राणाने आठ, वानिंदू हसरंगाने चार, शुभम दुबेने नऊ आणि जोफ्रा आर्चरने १६ धावा केल्या. दरम्यान, महिश तीक्षना आणि तुषार देशपांडे यांनी अनुक्रमे एक आणि दोन धावा करून नाबाद राहिले.
कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पाचही गोलंदाजांनी त्यांचे पूर्ण षटके टाकली. वैभव अरोराने ४ षटकांत ३३ धावा देत २ बळी घेतले. हर्षित राणाने ३६ धावा दिल्या. दोन्हीही किफायतशीर होते पण फिरकीपटूंनी अधिक प्रभावित केले. मोईन अलीने ४ षटकांत फक्त २३ धावा दिल्या आणि वरुण चक्रवर्तीने फक्त १७ धावा दिल्या. चारही गोलंदाजांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर स्पेन्सर जॉन्सनने १ विकेट घेतली.