
विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांचे प्रतिपादन
नाशिक : आरोग्य क्षेत्रात डिजिटल हेल्थ या संरचनेमुळे भविष्यात मोठे बदल होणे अपेक्षीत असून सर्वसामान्यांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होऊ शकते असे प्रतिपादन नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत ॲडव्हान्सड प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर सिनिअर फॅकल्टी-लेवल तीन या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ प्रवीण गेडाम यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, प्र-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधिकिरण सोनकांबळे, डॉ पायल बन्सल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी सांगितले की, डिजिटल हेल्थ या संकल्पनेने आरोग्य सेवा क्षेत्र अधिक कार्यक्षम होण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. भारतात डिजिटल हेल्थचा वापर वाढत आहे, विशेषतः कोविड कालावधीत वापरण्यात आलेले विविध ॲप्स टेलिमेडिसिन, हेल्थ ॲप्स, आणि इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञामुळे आरोग्यसेवेला नवे परीमाण लाभले आहे. आयुष्मान भारत या केंद्र सरकारच्या संकल्पनेतून डिजिटल मिशनची सुरुवात करण्यात आली आहे, ज्यामध्ये डिजिटल हेल्थ आयडी आणि हेल्थ इन्फॉर्मेशन एक्सचेंजचा समावेश आहे. हे उपक्रम रुग्णांच्या आरोग्य विषयक माहितीचे सुरक्षित डिजिटलीकरण करण्यासाठी वापरले जाते असे त्यांनी सांगितले.
गेडाम पुढे म्हणाले की, आभा कार्ड हे भारताच्या डिजिटल हेल्थ मिशनच्या वाटचालीतील क्रांतीकारक पाऊल आहे. आभा कार्ड ही भारत सरकारची डिजिटल हेल्थ आयाडी प्रणाली आहे, ज्याचा नागरिकांना त्यांचा आरोग्य डेटा सुरक्षितपणे ठेवण्यास मदत करत आहे. आधार कार्डासारख्या संरचना असलेल्या आभा कार्डमुळे देशातील प्रत्येक नागरिकांची आरोग्यविषयक माहिती उपलब्ध होऊ शकते. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात नाम साधर्म्य असलेले असंख्य लोक आहेत. मात्र दोन सारखी नावे असलेल्या लोकांचे आरोग्य कधीच एकसमान असू शकणार नाही. यासाठीच प्रत्येक नागरिकाचे स्वतंत्र आभा कार्ड असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आरोग्य विद्यापीठातर्फे ॲडव्हान्सड प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर सिनिअर फॅकल्टी-लेवल तीन यासारख्या उपक्रमांचे महत्वपूर्ण आणि उपयुक्त ठरणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, आरोग्य विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सलन्सतर्फे फॅक्लटी डेव्हल्पमेंट अकॅडमी सुरु करण्यात आले असून त्यात चार टप्प्यावर प्रशिक्षण दिले जाते. तृतीय ॲडव्हान्सड प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम टप्प्यावर हा आरोग्य शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या वरीष्ठ शिक्षकांसाठी ठेवण्यात आलेला आहे.
माधुरी कानिटकर पुढे म्हणाल्या की, विद्यापीठातर्फे संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यशाळा राबविण्यात येतात. जेणेकरुन संशोधनाला नवी दिशा मिळेल. वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आरोग्य आदी विषयांवर भरीव काम करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आरोग्य शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा शोध आपल्या देशातही होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ सुप्रिया पालवे यांनी केले. डॉ गौरंग बक्षी यांनी आभार मानले.