
पाच सामन्यात तीनदा शून्यावर बाद
वेलिंग्टन ः न्यूझीलंड क्रिकेट संघाने टी २० मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा ८ विकेट्सने पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने मालिका ४-१ अशी जिंकली. या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या पाकिस्तानच्या सलामीवीर हसन नवाज याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवण्यात आला. या मालिकेत त्याने एक तुफानी शतकही झळकावले, पण त्या सामन्याव्यतिरिक्त मालिकेतील इतर सामन्यांमध्ये त्याची कामगिरी चांगली नव्हती. तीन सामन्यात नवाज शून्यावर बाद झाला हे विशेष.
हसन नवाज याची पहिली टी २० मालिका होती. पहिल्याच सामन्यात खाते न उघडता बाद झाल्यामुळे हसन नवाज याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण खराब राहिले. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने शानदार शतकी खेळी केली. या सामन्यात हसन नवाजने १०५ धावा केल्या. ४५ चेंडूंच्या या खेळीत त्याने ७ षटकार आणि १० चौकार मारले. पाकिस्तान क्रिकेट संघाने जिंकलेला हा मालिकेतील एकमेव सामना होता. हसनला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.
पाकिस्तानी सलामीवीराने तिसऱ्या टी २० वगळता कोणत्याही सामन्यात २ धावाही काढल्या नाहीत. तो ३ वेळा शून्यावर बाद झाला तर एका सामन्यात तो फक्त १ धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मालिकेतील पहिल्या, दुसऱ्या आणि पाचव्या टी २० मध्ये हसन नवाज खाते न उघडताच बाद झाला. तो टी २० मालिकेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा सलामीवीर फलंदाज बनला आहे.
ही हसनची पहिली टी२० मालिका होती. त्याने ५ सामन्यांमध्ये एकूण १०६ धावा केल्या, तर एका डावात त्याने १०५ धावा केल्या. त्याने एकूण २६ टी २० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५९८ धावा केल्या आहेत.