
प्राचार्य अशोक तेजनकर यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : जगभरामध्ये २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने देवगिरी महाविद्यालय भूशास्त्र विभाग, जिओफोरम, ग्रीनक्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जल व्यवस्थापनाबद्दल जन जनजागृती व्हावी म्हणून संतोष जोशी गोळेगावकर, सरपंच गोळेगाव तालुका खुलताबाद यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा जलतज्ज्ञ डॉ अशोक तेजनकर हे होते. संतोष जोशी म्हणाले की, गोळेगावचा आजचा जो विकास आहे. याला मुख्य कारण म्हणजे भूजल वृद्धीसाठी गावकऱ्यांनी केलेली विविध कामे आणि गावकऱ्यांमध्ये झालेली जलजागृती आहे. त्यामुळे आज उन्हाळ्यामध्ये सुद्धा गोळेगावला पिण्याचे पाणी उपलब्ध असते. या कार्यक्रमांमध्ये त्यांनी मृदसंधारण, जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या समाजामध्ये त्यांनी श्रमनिष्ठा, श्रमदान आदी माध्यमातून आपण आपले गाव निसर्ग संपन्न, जलसंपन्न करू शकतो असे प्रतिपादन केले.
प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जागतिक जलदिन १९९३ पासून दरवर्षी जगभर साजरा केला जातो. त्यासाठी युनोतर्फे जागतिक पातळीवर पाण्याचा क्षेत्रात संशोधन आणि विकास व्हावा म्हणून दरवर्षी युनोतर्फे एक विषय दिला जातो आणि त्याविषयावर जगातील सर्व देशांनी वर्षेभर कार्यक्रम, जनजागृती व संशोधन करावे असे सुचित केलेले असते. त्यानुसार २०२५ वर्षासाठी जागतिक जलदिनाचा विषय ‘हिमनद्यांचे संवर्धन’ हा दिलेला आहे. वाढत्या तापमानामुळे हिमखंडाचे वितळने आणि सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारे बदल हा मोठा प्रश्न मानवजाती समोर उभा राहिला आहे. हिमखंड वितळण्यामुळे भुखंडाचा भाग पाण्याखाली जाण्याचे प्रमाण वाढत आहे. वृक्षारोपण, वायू प्रदूषण, शहरीकरण, वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण या कारणांमुळे वाढणारे तापमान कशा प्रकारे संतुलित करता येईल हे काम या वर्षी करावे असे आवाहन प्राचार्य डॉ तेजनकर यांनी केले. विद्यार्थ्यांना नैसर्गिक जल पातळी, भू संरचना याबाबत ह्यानी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी तापमान कमी करण्यासाठी वृक्षारोपन, पाण्याची बचत, जल पुनर्भरण याबाबत सक्रिय झाले पाहिजे. या विषयावर कृती कार्यक्रमांचे आयोजन झाले पाहिजे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ रंजना गावंडे यांनी केले.