
नांदेड ः नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना नांदेडच्या लता उमरेकर यांनी बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी प्रकारात कांस्यपदक पटकावले.
इंदिरा गांधी स्टेडियममधील जिम्नॅस्टिक्स हॉलमध्ये बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत देशातील विविध राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवत यश संपादन केले. त्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना नांदेडच्या लता उमरेकर यांनी महिलांच्या एसएच ६ या ग टात बॅडमिंटन एकेरी प्रकारात कांस्यपदक जिंकले.
लता उमरेकर यांनी केरळच्या सुरण्या सुरेंद्रन हिचा २१-८, २१-२ असा पराभव करुन उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत तामिळनाडूच्या नित्याश्री हिच्याकडून लता यांना २१-६, २१-४ असा पराभव स्वीकारावा लागला आणि त्यामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
या चमकदार कामगिरीबद्दल क्रीडा आयुक्त हरिलाल सोनवणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक सुहास पाटील, उपसंचालक उदय जोशी, उपसंचालक संजय सबनीस, चेतन माने, किरण माने, फिजिओ सुमेध वाघमारे, आई-वडिलांनी त्यांचे अभिनंदन केले.