कोल्हापूर, पुणे, सांगली संघाला दुहेरी मुकुटाची संधी

  • By admin
  • March 27, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

भाई नेरुरकर चषक राज्य खो-खो स्पर्धा ः धाराशिव, मुंबई उपनगर संघांचीही अंतिम फेरीत धडक

इचलकरंजी ः कोल्हापूर संघाने पुरुष व किशोर गटात, पुणे जिल्ह्याने महिला व किशोरी गटात तर सांगली संघाने किशोर व किशोरी गटातून भाई नेरूरकर चषक राज्य खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच धाराशिवच्या महिला व मुंबई उपनगरच्या पुरुष संघानेही अंतिम फेरीत धडक मारली आहे.

राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा खात्याच्या वतीने इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील विठ्ठल रामजी शिंदे शाळा क्रमांक २१च्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. उपांत्य फेरीत मुंबई उपनगर संघाने सांगली संघाचा १७-१६ असा १.३० मिनिटे राखून पराभव केला. मुंबई उपनगरच्या अक्षय भांगरे याने (१.३०0, १.५० मिनिटे संरक्षण व १ गुण), दीपक माधव (१.४० मिनिटे व ४ गुण), अनिकेत पोटे (१.२० मिनिटे व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. सांगली संघाकडून ओंकार पाटील (१.३० नाबाद व ६ गुण) व सौरभ घाडगे (१.३० मिनिटे व ४ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात हाफ टाइमपर्यंत १०-११ अशी कडवी लढत दिलेल्या पुण्यास यजमान कोल्हापूर संघाने २२-१८ असे ४ गुणांनी हरविले. कोल्हापूरच्या श्रीराम कांबळे (१.१० मिनिटे, २ गुण), सौरभ आडावकर (५ गुण) व शरद घाटगे (४ गुण) यांनी संघाचा विजय खेचून आणला. पुण्याच्या अभिषेक भोसले (१.४०, १.४० मिनिटे), रितेश कडगी (५ गुण) व विवेक ब्राह्मणे (४ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.

महिला गटातील उपांत्य सामन्यात हाफ टाइमपर्यंत ७-७ असे बरोबरीत रोखलेल्या कोल्हापूरला धाराशिव संघाने १२-१० असे २ गुण आणि ३.१० मिनिटे राखून नमविले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात हाफ टाइमच्या ६-८ अशा पिछाडीवरून पुण्याने ठाण्यावर १६-१२ असा ४ गुणांनी विजय मिळविला. पुणे संघाकडून पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिने (२.१०, २.३० मिनिटे संरक्षण व ४ गुण) अष्टपैलू कामगिरी केली. तिला दिपाली राठोड (२.२० मिनिटे व ४ गुण) व भाग्यश्री बडे (१.१०, १.४० मिनिटे व एक गुण) यांनी साथ दिली. ठाणे संघाकडून रेश्मा राठोड (२.२०, २.०० मिनिटे), दीक्षा सोनुरकर (१.३०, १.३० मिनिटे व ३ गुण) व गीतांजली नरसाळे (२.१० मि. संरक्षण) यांनी लढत दिली.

किशोर गटातील उपांत्य सामन्यात कोल्हापूर संघाने धाराशिव संघावर १५-१४ असा १ गुण व २.२० मिनिटे राखून मात केली. हाफ टाइमची ९-८ ही एका गुणाची आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. कोल्हापूर संघाकडून देवराज यड्रावे (१.४०, २.०० मिनिटे व १ गुण), रुद्र यादव (२.५० मिनिटे व २ गुण) व ओजस बंडगर (६ गुण) यांनी संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. धाराशिव संघाच्या सुरेश वसावे (१.२०,१.१० मिनिटे व ४ गुण), भीमसिंग वसावे (१.००, १.२० मिनिटे व ५ गुण), आदित्य पांचाळ (१.३० मिनिटे व १ गुण) यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात सांगली संघाने सातारा संघास २०-१६ असे ४ गुणांनी हरविले. साताराकडून वैभव जाधव याने दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी १.४० मिनिटे संरक्षण करीत २ गडी बाद गेले व वरद पोळ (१.१०, २.०० मिनिटे व ३ गुण) यानेही अष्टपैलू खेळ करीत लढत दिली. सांगली संघाकडून सार्थक हिरेकुर्ब (२.५० मिनिटे व ४ गडी), आदर्श सरगर (१.१० मि. व ३ गडी), दक्ष जाधव (१.१० मिनिटे व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ करीत संघाचा विजय सुकर केला,

किशोरी गटातील उपांत्य सामन्यात सांगलीने ठाण्यास १४-८ असे ६ गुणांनी नमविले. सांगली संघाकडून श्रावणी तामखडे (३.००, १.०० मिनिटे), अनुष्का तामखडे (१.४०, २.४० मिनिटे व ७ गडी) व वेदिका तामखडे हिने (१.००, २.०० मिनिटे) तर ठाण्याकडून प्रणिती जगदाळे (२.१०, १.१० मिनिटे), स्वरा साळुंखे (१.४० मि.) व निधी जाधव (१.२० मिनिटे व २ गडी) यांनी कामगिरी केली.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुणे संघाने धाराशिव संघावर १२-१० असा २ गुण व ३ मिनिटे राखून विजय मिळविला. पुणे संघाकडून अपर्णा वर्धे हिने २.०० व १.१० मिनिटे संरक्षण करीत ४ गडी बाद केले. आराध्या गीते हिने १.४० मिनिटे पळती करीत २ गडी बाद करीत संघाच्या विजयात साथ दिली. धाराशिव संघाकडून कृष्णावली कवडे (१.२० मिनिटे व १ गडी), राही पाटील (१.००, १.३० मिनिटे व १ गडी), श्रावणी गुंड (१.०० मिनिटे व २ गडी) यांचे प्रयत्न अपुरे पडले.

असे होणार अंतिम सामने

पुरुष गट ः कोल्हापूर विरुद्ध मुंबई उपनगर

महिला गट ः धाराशिव विरुद्ध पुणे

किशोर गट ः कोल्हापूर विरुद्ध सांगली

किशोरी गट ः सांगली विरुद्ध पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *