
चेन्नई ः आयपीएल स्पर्धेचा आठवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात शुक्रवारी खेळला जाणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. त्याने हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शानदार कामगिरी केली होती. हा विराट कोहलीचा ४०० वा टी २० सामना होता आणि ४०० टी २० नंतर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई संघाविरुद्धच्या सामन्यातही विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी उत्सुक असेल.
विराट कोहलीने आतापर्यंत टी २० क्रिकेटमध्ये ४०० सामन्यांच्या ३८३ डावांमध्ये १३४.३१ च्या स्ट्राईक रेटने आणि ४१.६२ च्या सरासरीने १२९४५ धावा केल्या आहेत. या काळात कोहलीने ९ शतके आणि ९८ अर्धशतके झळकावली आहेत. या काळात त्याचा सर्वोच्च धावसंख्या १२२ धावा नाबाद आहे. जर विराट कोहलीने चेन्नईविरुद्ध ५५ धावा केल्या तर तो टी २० क्रिकेटच्या इतिहासात १३ हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय ठरेल. याशिवाय, १३ हजार धावांचा आकडा गाठणारा विराट कोहली हा एकूण पाचवा खेळाडू असेल.
सर्वात जलद १३ हजार धावांचा विक्रम
जर विराट कोहलीने चेन्नईविरुद्ध ५५ किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर तो टी २० स्वरूपात सर्वात जलद १३ हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असेल. या यादीत क्रिस गेल अव्वल स्थानावर आहे, ज्याने ३८१ डावांमध्ये ही कामगिरी केली. तर कोहलीने आतापर्यंत ३८३ डाव खेळले आहेत. या यादीत सध्या दुसऱ्या स्थानावर अॅलेक्स हेल्स आहे, ज्याने ४७४ डावांमध्ये हा विक्रम केला आहे. तर पाकिस्तानी खेळाडू शोएब अख्तरने ४८७ डावांमध्ये आणि किरॉन पोलार्डने ५९४ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
चेन्नई विरुद्ध विराट कोहलीची कामगिरी
विराट कोहलीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ३२ सामन्यांमध्ये १२६ च्या स्ट्राईक रेटने १०५३ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ९ अर्धशतके झळकावली आहेत. या सामन्यात कोहलीने चार धावा करताच तो चेन्नई संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. हा विक्रम सध्या शिखर धवनच्या नावावर आहे, ज्याने २९ डावांमध्ये १३२ च्या स्ट्राईक रेटने १०५७ धावा केल्या आहेत. शिखरने चेन्नईविरुद्ध ८ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. याशिवाय, विराट कोहली चेपॉक मैदानावर ३६ धावा करताच, तो या मैदानावर आपले ५०० धावा पूर्ण करेल.