महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची शनिवारी वार्षिक सर्वसाधारण सभा

  • By admin
  • March 28, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक भवन, खेळाडूंचा सत्कार अशा विविध विषयांवर चर्चा

पुणे ः महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची २०२३-२०२४ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ मार्च रोजी पुणे शहरातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला संलग्न एकविध खेळांच्या प्रत्येक राज्य संघटनेचे दोन प्रतिनिधी आणि सहयोगी म्हणून मान्यता असलेल्या एकविध खेळाच्या प्रत्येक राज्य संघटनेचा एक प्रतिनिधी या सभेस हजर राहू शकतात. या सभेत ११ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून संमत करणे, कार्यकारिणी मंडळाने मंजूर केलेले अनेक अहवाल, अंदाजपत्रक, लेखाविवरणपत्र, ताळेबंदपत्र यांना मंजुरी देणे असे विविध विषय या सभेत आहेत. लेखापाल नियुक्ती विषयावर देखील या सभेत चर्चा होईल.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२५ आयोजनाबाबत चर्चा करुन निर्णय घेणे हा एक महत्वाचा विषय सभेत असणार आहे. २०२४ मध्ये आयोजित केलेल्या ऑलिम्पिक डे कार्यक्रमाचा आढावा घेतला जाईल. उत्तराखंड येथे झालेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकप्राप्त खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्याबाबत चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, अत्याधुनिक सोयीसुविधा तसेच खेळाचा दर्जा वाढवणे अशा अनेक बाबींसाठी सर्व राज्य संघटना अध्यक्ष व सचिव यांची बैठक घेऊन त्यावर चर्चा करुन निर्णय घेणे हा या सभेतील एक महत्त्वाचा विषय आहे. जागतिक, ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा व इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यातील जास्तीत जास्त खेळाडू सहभागी होऊन पदक प्राप्त खेळाडू घडवमे याबाबतची दिशा व वाटचाल ठरवण्यासाठी राज्यातील विविध क्रीडा प्रकारांच्या मुख्य प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर व परिसंवाद कार्यक्रम आयोजित करणे या विषयावर या सभेत चर्चा होईल.

तक्रार निवारण समिती व छाननी समितीने शिफारशीनुसार कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयावर व विविध राज्य संघटनांकडून आलेल्या प्रस्तावाबाबत चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे. घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने घटना समितीचा अहवाल व आलेले अभिप्राय याबाबत चर्चा करुन निर्णय घेणे, ऑलिम्पिक भवन बाबत आढावा घेणे असे काही महत्वाचे विषय या सभेत असणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *