
पुणे ः पहिल्या साऊथ एशियन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आयुषा प्रमोद इंगवले हिने सांघिक सुवर्णपदक व वैयक्तिक कांस्यपदक जिंकून शानदार कामगिरी नोंदवली.
ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) येथे ही स्पर्धा नुकतीच झाली. या स्पर्धेत भारतासह नेपाळ, श्रीलंका, मालदीव या देशांच्या संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत आयुषा इंगवले हिने सांघिक स्पर्धेत सुवर्ण व वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक अशी दोन पदके जिंकली.
वैयक्तिक स्पर्धेत आयुषा हिने श्रीलंका ४-०, नेपाळ ४-०, भारत ४-१ असा विजय नोंदवत कांस्यपदक पटकावले. सांघिक स्पर्धेत आयुषा हिने भारताचे प्रतिनिधित्व करताना श्रीलंका ३-०, नेपाळ ४-१ असा विजय नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
या शानदार कामगिरीबद्दल महाराष्ट्र संघटनेचे सचिव रवींद्र सोनवणे, उपाध्यक्ष दीपक आरडे, संदीप व्यावरे यांनी तिचे अभिनंदन केले आहे. आयुषा ही बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज पुणे येथे बीबीए प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तिला विल्सन यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षक धीरेंद्र मिश्रा यांच्याबरोबर ती नियमित सराव करत आहे.