
अध्यक्ष अजय सिंग यांनी केली कारवाई
नवी दिल्ली ः भारतीय बॉक्सिंग फेडरेशनची निवडणूक सध्या क्रीडा क्षेत्रातील एक चर्चेचा विषय बनली आहे. भारतीय बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अजय सिंग यांनी संघनटेचे सचिव हेमंत कलिता व कोषाध्यक्ष दिग्विजय सिंग यांना निलंबित केले आहे.
अध्यक्ष अजय सिंग यांनी सरचिटणीस हेमंत कलिता आणि कोषाध्यक्ष दिग्विजय सिंग यांना आरईसी टॅलेंट हंट दरम्यान कंत्राटे देण्यात त्यांच्या पदांचा गैरवापर, पक्षपात आणि अनेक प्रसंगी खासगी सहलींसाठी बीएफआयच्या निधीचा वापर केल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर निलंबित केले.
दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती (निवृत्त) सुधीर कुमार जैन यांच्या नेतृत्वाखालील एक सदस्यीय चौकशी समितीच्या निष्कर्षांनुसार चौकशीत कलिता आणि दिग्विजय दोघांवरही पाच आरोपांवर कारवाई करण्यास जबाबदार असल्याचे आढळले. निविदा प्रक्रियेचे उल्लंघन, हॉटेल्स, रुग्णवाहिका आणि इतर सेवांसाठी फसवे बिल; तांत्रिक अधिकाऱ्यांचे चुकीचे वर्णन, वैयक्तिक प्रवासासाठी फेडरेशनच्या निधीचा गैरवापर आणि परकीय चलन वाटपाचा गैरवापर झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अजय सिंग यांनी दोन्ही पदाधिकाऱयांना निलंबित केले.
त्यांच्या निलंबनावर प्रतिक्रिया देताना कलिता यांनी टीओआयला सांगितले की, चौकशी समितीच्या निष्कर्षांबाबत, जर निधीचा गैरवापर झाला असेल तर अध्यक्ष स्वतःच प्रथम जबाबदार असतील कारण ते, कोषाध्यक्षांसह, सर्व धनादेशांवर स्वाक्षरी करतात आणि आर्थिक व्यवहारांना अधिकृत करतात. तसेच, या समितीला बीएफआयच्या कार्यकारी समिती किंवा सर्वसाधारण सभेत कधीही मान्यता देण्यात आली नव्हती.
माझ्या निलंबनाचा विचार करता, सिंग यांनी असे पत्र देणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. निवडणूक अधिकारी यांनी निवडणुकीची घोषणा केल्यानंतर, बीएफआयची सध्याची कार्यकारी समिती विसर्जित झाली आहे आणि कोणताही संघ राहिलेला नाही. अध्यक्षांना मला निलंबित करण्याचा कोणताही अधिकार नाही. मी या अनियमित निलंबनाविरुद्ध कायदेशीर मार्गाने जाईन असे कलिता पुढे म्हणाले.