
३२व्या शहीद भगतसिंग औद्योगिक चषक क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर ः ३२व्या शहीद भगतसिंग औद्योगिक चषक क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी शानदार प्रारंभ झाला. शहर पोलिस आणि वन विभाग या संघांनी दणदणीत विजयासह विजयी सलामी दिली. सुदर्शन एखंडे व यश यादव यांनी भंडारी इलेक्ट्रिकल्स सामनावीर पुरस्कार संपादन केला.
उद्घाटन प्रसंगी पहिला सामना कास्मो फिल्म्स व शहर पोलीस या संघादरम्यान खेळविण्यात आला. कास्मो फिल्म्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद १४९ धावा केल्या. त्यामध्ये सतीश भुजंगे याने सर्वाधिक ४५ चेंडूत २ षटकार व ४ चौकारांसह ५१ धावा काढल्या. त्याला सुरेख साथ देत कर्णधार विराज चितळे याने २३ चेंडूत ३ चौकारांसह २८ धावा फटकावल्या. सनी राजपूत याने १४ चेंडूत २ चौकारांसह १७ धावा, रामेश्वर मतसागर याने २४ चेंडूत १ चौकारासह १६ धावा तर मंगेश निटूरकर व व्यंकटेश सोनवलकर यांनी प्रत्येकी १३ धावांचे योगदान दिले.

शहर पोलिस संघातर्फे गोलंदाजी करताना सुदर्शन एखंडे याने २६ धावांत ३ गडी तर संजय सपकाळ व पांडुरंग गजे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात शहर पोलिस संघाने विजयी लक्ष १८ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये कर्णधार राहुल जोनवाल याने ३४ चेंडूत २ उत्तुंग षटकार व ४ चौकारासह ४६ धावा, आर्यन शेजुळ याने २३ चेंडूत १ षटकार व ३ चौकारांसह ३५ धावा, रिझवान अहमद याने १६ चेंडूत १ चौकारासह १४ धावा तर संजय सपकाळ व अरविंद शेजुळ यांनी प्रत्येकी १३ व ६ धावांचे योगदान दिले.
कास्मो फिल्म्स संघातर्फे गोलंदाजी करताना भास्कर जिवरग याने २७ धावात २ गडी तर मंगेश निटूरकर, व्यंकटेश सोनवलकर, धनंजय जाधव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला तर १ गडी धावचित झाला.
दुसरा सामना वन विभाग व घाटी रुग्णालय या संघा दरम्यान खेळविण्यात आला. घाटी रुग्णालय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. वन विभाग संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ बाद १८२ धावा केल्या. यामध्ये यश यादव याने ४४ चेंडूत ८ चौकारांसह सर्वाधिक ५८ धावा काढल्या. मोहम्मद शमीम याने १० चेंडूत १ उत्तुंग षटकार व ४ चौकारांसह २९ धावा, महेंद्र श्लोक याने २० चेंडूत २ चौकारांसह २२ धावा तर सोमनाथ पाचलिंगे याने १५ चेंडूत दोन चौकारांसह २० धावांचे योगदान दिले.
घाटी रुग्णालय संघातर्फे गोलंदाजी करताना अर्जुन पटेल याने २१ धावात २ गडी तर अमोल दौड, दादासाहेब कातर व मोहम्मद अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरात घाटी रुग्णालय संघ सर्वबाद ११५ धावा करू शकला. यामध्ये मोहम्मद अली याने १४ चेंडूत २ उत्तुंग षटकार व ३ चौकारांसह ३१ धावा, मिलिंद तोगरवाड याने २९ चेंडूत ३ चौकारांसह ३० धावा, राहुल हावळे याने ७ चेंडूत १ उत्तुंग षटकार व २ चौकारांसह १६ धावा तर अमोल दौड याने १५ चेंडूत १ चौकारासह १० धावांचे योगदान दिले.
वन विभाग संघातर्फे गोलंदाजी करताना यश यादव याने भेदक गोलंदाजी करत केवळ १८ धावात ५ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. मोहम्मद शमीम याने ९ धावात २ गडी तर सय्यद तल्हा व ज्ञानेश्वर मुंडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
उद्घाटन सोहळा
गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या कॉस्मो फिल्म्स प्रायोजित व शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित ३२ व्या शहीद भगतसिंह क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कास्मो फिल्म्स कंपनीचे उपाध्यक्ष संजय चिंचोलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर तसेच शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे, शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे कोषाध्यक्ष भगवान भोजने तसेच ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू रमेश ढाकणे, संजय पाठे आदी मान्यवर उपस्थित होते.
या दोन सामन्यात पंचाची भूमिका अजय देशपांडे, विष्णू बब्बीरवार, महेश जहागीरदार व सुनील बनसोडे यांनी पार पाडली. गुणलेखनाची भूमिका किरण भोळे याने पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजक समितीतर्फे गंगाधर शेवाळे, राजेश सिद्धेश्वर, अनंत नेरळकर, उदय बक्षी, सागर वैद्य, संदीप भंडारी, राकेश सूर्यवंशी, डॉ प्रशांत याकुंडी, जितेंद्र बरंजाळेकर, योगेश मानकापे आदींनी पुढाकार घेतला आहे.
शनिवारचे सामने
- एसटी महामंडळ व ऋचा इंजिनिअरिंग (सकाळी ८ वाजता)
- गुड इयर व प्रिसिएशन प्रॉडक्ट (सकाळी ११ वाजता)
- होमिओपॅथिक डॉक्टर्स व लॅब टेक्निशियन (दुपारी २ वाजता)