
रजत पाटीदार, जोश हेझलवूड, यश दयालची कामगिरी संस्मरणीय
चेन्नई : कर्णधार रजत पाटीदार (३२ चेंडूत ५१), टिम डेव्हिड (८ चेंडूत नाबाद २२), यश दयाल (२-१८) आणि जोश हेझलवूड (३-२१) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर आरसीबी संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर ५० धावांनी पराभूत करुन आयपीएल स्पर्धेतील सलग दुसरा विजय साकारला.
घरच्या मैदानावर खेळताना चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर विजयासाठी १९७ धावांचे लक्ष होते. मात्र, चेन्नई संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यांचे आघाडीचे धमाकेदार फलंदाज स्वस्तात बाद झाले. १० षटकापर्यंत चेन्नई संघाची स्थिती ४ बाद ६५ अशी चिंताजनक झाली.
राहुल त्रिपाठी (५), कर्णधार रुतुराज गायकवाड (०), दीपक हुडा (४), सॅम करन (८) हे आक्रमक फलंदाज झटपट बाद झाले. जोश हेझलवूड याने राहुल, रुतुराज यांना बाद करुन चेन्नईला मोठा धक्का दिला. भुवनेश्वर याने हुडा आणि लिव्हिंगस्टोन याने करन याला बाद करुन चेन्नई संघासमोर मोठे आव्हान उभे केले.

एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना सलामीवीर रचिन रवींद्र याने आपल्या शैलीत खेळत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरलेल्या शिवम दुबे याने षटकार, चौकार ठोकून सामन्यात थोडे चैतन्य आणले. रचिन रवींद्र व शिवम दुबे या जोडीवर मोठी भिस्त होती. परंतु, यश दयाल याने १३व्या षटकात रचिन रवींद्र (४१) आणि रवींद्र जडेजा (१९) यांना क्लीन बोल्ड करुन चेन्नई संघाचा पराभव निश्चित केला. त्यावेळी चेन्नईची स्थिती सहा बाद ८१ अशी दयनीय झाली होती.
रविचंद्रन अश्विन ११ धावांवर बाद झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला. त्यावेळी चेन्नईला षटकामागे २० धावांची गरज होती. रवींद्र जडेजा २५ धावांचे योगदान देऊन तंबूत परतला. हेझलवूड याने जडेजाला बाद करुन सामन्यातील तिसरा बळी घेतला. तीनही विकेट त्याने उसळत्या चेंडूवर घेतल्या हे विशेष. शेवटच्या षटकात धोनीने कृणाल पांड्याला दोन उत्तुंग षटकार ठोकत चाहत्यांना खुश केले. धोनीने १६ चेंडूत नाबाद ३० धावा फटकावल्या. चेन्नई संघ २० षटकात आठ बाद १४६ धावा काढल्या.चेन्नईला ५० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने चेन्नई संघाला चिंतन करण्याची वेळ आली आहे. हेझलवूड (३-२१), यश दयाल (२-१८), लिव्हिंगस्टोन (२-२८) यांनी प्रभावी गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
आरसीबीचे १९७ धावांचे आव्हान
प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १९६ धावा केल्या. कठीण काळात कर्णधार रजत पाटीदारने महत्त्वाची अर्धशतकी खेळी केली तर टिम डेव्हिड याने शेवटच्या षटकात सलग ३ षटकार मारून संघाचा स्कोअर १९६ पर्यंत पोहोचवला. चेन्नई सुपर किंग्जकडून नूर अहमदने सर्वाधिक विकेट्स घेतल्या, त्याने विराट कोहलीसह एकूण ३ विकेट्स घेतल्या.
फिल साल्ट आणि विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली. साल्ट आक्रमकपणे खेळत होता पण नूर अहमदने टाकलेल्या पाचव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एमएस धोनी याने त्याला बुलेटच्या वेगाने स्टंप केले आणि पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सॉल्टने १६ चेंडूत ३२ धावा केल्या. त्यामध्ये त्याने १ षटकार आणि ५ चौकार मारले.
तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या देवदत्त पडिक्कलने आक्रमक खेळ केला पण आठव्या षटकात अश्विनने त्याला बाद केले. त्याने १४ चेंडूत २ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २७ धावा केल्या. त्याने कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कोहलीने कर्णधार रजत पाटीदारसह ४१ धावांची भागीदारी केली. ३० चेंडूत ३१ धावा काढल्यानंतर कोहली बाद झाला, त्याची विकेट नूर अहमदने घेतली.
रजत पाटीदारची शानदार खेळी
कोहली बाद झाल्यानंतर, लियाम लिव्हिंगस्टोन (१०) देखील नूर अहमदच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. जितेश शर्माही १२ धावा करून बाद झाला. तथापि, दुसऱ्या टोकाला, रजत पाटीदारने चांगले फटके मारले आणि एक महत्त्वाचे अर्धशतक झळकावले. त्याने ३२ चेंडूत ५१ धावा केल्या, या डावात त्याने ३ षटकार आणि ४ चौकार मारले. शेवटच्या षटकात सॅम करन याला टिम डेव्हिडने सलग तीन षटकार मारले आणि त्या षटकातून एकूण १९ धावा काढल्या. डेव्हिडने २२ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांसह २२ धावा काढत नाबाद राहिला.
चेन्नईकडून फिरकी गोलंदाज नूर अहमदने तीन, मथिशा पाथिरानाने दोन आणि खलील अहमद आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक बळी घेतला.