
रांची : झारखंडमधील रांची येथील मरंग गोमके जयपाल सिंग मुंडा अॅस्ट्रो टर्फ येथे झालेल्या चुरशीच्या सामन्यात हॉकी हरियाणा राष्ट्रीय महिला हॉकी लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हरियाणा संघाने ओडिशा संघाला ३-२ असे पराभूत करत विजेतेपद संपादन केले.
अकरा दिवस चाललेल्या या स्पर्धेतील बहुप्रतिक्षित अंतिम सामन्यात हॉकी हरियाणाने हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाविरुद्ध ३-२ असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. अहल्या लाक्रा (८ मिनिटे) हिने हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा संघासाठी गोलांचे खाते उघडले. परंतु, विजेत्या हॉकी हरियाणाचे नियोजन वेगळे होते. काजल (१२ मिनिटे, २२ मिनिटे) हिने तिच्या संघासाठी दोन गोल केले, तर सावी (४४ मिनिटे) हिने विजयी संघासाठी एक गोल केला. पहिला गोल केल्यानंतर हॉकी हरियाणाच्या बचावफळीने प्रतिस्पर्ध्याला गोल करण्यापासून रोखले. पण शेवटच्या क्षणी दीपिका बरवा (५४ मिनिटे) हिने सुरेख गोल करत पुन्हा ओडिशा संघाला सामन्यात आणले. परंतु शेवटची शिट्टी वाजल्यानंतर हा प्रयत्न व्यर्थ ठरला. संपूर्ण स्पर्धेत हॉकी हरियाणा संघ अव्वल स्थानावर राहिला.
“आमचा संघ हॉकी हरियाणा नेहमीच आक्रमक हॉकी खेळण्यासाठी ओळखला जातो आणि आजही तोच एकमेव प्लॅन होता. मी संघाला मोकळेपणाने आणि आक्रमक हॉकी खेळण्यास सांगितले. आम्ही यापूर्वीही हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाशी खेळलो आहोत, आम्हाला माहिती आहे की ते पेनल्टी कॉर्नरमध्ये किती चांगले रूपांतर करत आहेत, आमच्या संघाने त्यांना रोखण्यात चांगले प्रदर्शन केले आणि अंतिम सामन्यात हाच गेम चेंजर ठरला”, असे या स्पर्धेत हॉकी हरियाणाचे मुख्य प्रशिक्षक दिलबाग सिंग म्हणाले.
तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठीच्या दुसऱ्या सामन्यात हॉकी झारखंडने हॉकी मध्य प्रदेशला १-० असे हरवून पोडियम फिनिशिंगसह आपला मोहिमेचा शेवट केला. खेळाच्या पहिल्या क्वार्टरमध्ये स्वीटी डुंगडुंग (१२ मिनिटे) हिने हॉकी झारखंड संघासाठी सामन्याचा निर्णायक गोल केला.