
नवी दिल्ली ः एफआयएच ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा तामिळनाडूची राजधानी चेन्नई आणि मदुराई येथे आयोजित केली जाणार आहे. हॉकी इंडियाने शुक्रवारी सांगितले की, ही स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान होणार आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेत २४ संघ जेतेपदासाठी सहभागी होतील. ही स्पर्धा भारतात तिसऱ्यांदा होणार आहे.
भारत तिसऱ्यांदा ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. यापूर्वी २०१६ मध्ये लखनौ आणि २०२१ मध्ये भुवनेश्वर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की म्हणाले की, “आगामी एफआयएच ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणे हॉकी इंडियासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी २४ संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत, त्यामुळे चेन्नई आणि मदुराई या दोन शहरांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. २०२३ मध्ये चेन्नई येथे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात आली होती, तर मदुराई पहिल्यांदाच या दर्जाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात हॉकी स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत याचा आम्हाला आनंद आहे.
२०२१ मध्ये अर्जेंटिनाने ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक जिंकला, तर २०२३ मध्ये जर्मनीने क्वालालंपूर येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत आणि कांस्यपदकाच्या प्लेऑफमध्ये पराभव पत्करल्यानंतर भारत चौथ्या स्थानावर राहिला होता.