
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे १३ एप्रिलपासून आयोजन, भारतातील दिग्गज महिला खेळाडूंचा सहभाग
पुणे : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने फिडे महिला ग्रँड प्रिक्स (ग्रांप्री) बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्याचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत जगातील अव्वल बुद्धिबळ पटूचा सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा अमनोरा द फर्न येथे १३ ते २४ एप्रिल या कालावधीत रंगणार आहे.
अत्यंत प्रतिष्ठेच्या कँडीडेट स्पर्धेसाठी या स्पर्धेतून पात्र ठरण्याची संधी असल्यामुळे जागतिक स्पर्धेची आव्हानवीर संधी मिळणार असल्यामुळे या स्पर्धेला अत्यंत महत्व असल्याचे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ परिणय फुके यांनी सांगितले.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश चितळे यांनी सांगितले की, सध्याची जागतिक रॅपिड विजेती आणि ऑलिम्पियाड सुवर्णपदक विजेती भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली व ग्रँडमास्टर आर वैशाली, आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख यांच्यासह चीनची ग्रँडमास्टर झू जीनर, रशियाची आंतरराष्ट्रीय मास्टर पोलिना शुव्हालोहा, पोलंडची आंतरराष्ट्रीय मास्टर एलिना कॅशलीनस्काया, बल्गेरियाची आंतरराष्ट्रीय मास्टर सालिनोव्हा न्यूरघ्युन, मंगोलियाची आंतरराष्ट्रीय मास्टर बॅट खुयाक व जॉर्जियाची आंतरराष्ट्रीय मास्टर मेलिना सॅलोम यांच्यासह अगोदरच्या टप्प्यातील कामगिरी वरून १४ अव्वल खेळाडू या स्पर्धेसाठी निवडण्यात आले असून विविध देशांमधील खेळाडूंना सहा वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश देण्यात आला आहे.
डॉ परिणय फुके पुढे म्हणाले की, महिलांच्या फिडे स्पर्धेचा पाचवा टप्पा पुण्यात आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडूंबरोबरच पुण्यातील आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख वाईल्ड कार्ड द्वारे या स्पर्धेत खेळणार आहे. महिलांचे सबलीकरण आणि नव्या पिढीला प्रेरणा देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव व स्पर्धा संचालक निरंजन गोडबोले म्हणाले की, जगातील सर्वोत्तम महिला बुद्धिबळपटू या स्पर्धेच्या निमित्ताने पुण्यात खेळणार असून भारतीय खेळाडूंसाठी सर्वोत्तम व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून दिले आहे. कोनेरु हंपी, हरिका द्रोणावल्ली, आर वैशाली आणि दिव्या देशमुख यांच्या सहभागामुळे महिला बुद्धिबळातील भारताची ताकद दिसून येते.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले की, पुणे हे भारतातील बुद्धिबळाचे नेहमीच महत्वाचे केंद्र राहिले असून इतकी प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित करणे हा आमचा बहुमानच आहे. जगभरातील अव्वल खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा प्रचंड यशस्वी ठरेल यात शंका नाही. केवळ बुद्धिबळाचा प्रचार प्रसार करणे हे आमचे एकच ध्येय नसून विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागासाठी महिलांना प्रेरणा देणे हा आमचा हेतू आहे.
संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ परिणिता फुके म्हणाल्या की, इतकी प्रतिष्ठेची आयोजित करणे रोमांचकारी असून स्पर्धेला भरघोस यश मिळावे यासाठी दिवस रात्र मेहनत करीत आहोत. या स्पर्धेमुळे पुणे शहराला व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेला एक आंतरराष्ट्रीय ओळखच मिळणार असून त्याबरोबरच भारतातील युवा महिला खेळाडूना प्रेरणा मिळणार आहे. जगातील सर्वाधिक मानांकित ज्युनियर महिला खेळाडू दिव्या देशमुखच्या सहभागामुळे महाराष्ट्रातील बुद्धिबळपटूंचा उत्साह व आकर्षण वाढणार आहे.
महिला फिडे स्पर्धा मालिकेतील सर्वोत्तम दोन खेळाडू कँडीडेट स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार असून पुढच्या वर्षीच्या जागतिक स्पर्धेसाठी आव्हानवीर निश्चित करण्यात या स्पर्धेची महत्त्वाची भूमिका आहे. महिलांच्या फिडे स्पर्धा मालिकेतील या आधीच्या टप्प्याचे आयोजन जॉर्जिया, कझाकस्तान, मोनॅको व सायप्रस येथे करण्यात आले होते. आता भारत व ऑस्ट्रेलिया येथील दोन टप्पे बाकी आहेत. यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मयूर आणि प्रकाश कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते.