आयकर विभागाचा सागर कातुर्डे भारत श्री विजेता

  • By admin
  • March 29, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

मुंबई ः इंडियन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशन यांच्यावतीने नुकतीच साईनगर, शिर्डी येथे ६५वी सीनियर नॅशनल बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत २९ राज्यातून सुमारे ३७५ शरीरसौष्ठवपटूनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत आयकर विभागाच्या सागर कातुर्डे याने भारत श्री हा किताब पटकावला. 

भारतीय शरीरसौष्ठवाची खरी श्रीमंती ज्या स्पर्धेत मंचावर उतरते, त्या मानाच्या प्रतिष्ठेचा भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार सोहळा इंडियन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशन यांच्या विद्यमाने जोशपूर्ण वातावरणात साईबाबांच्या शिर्डीच्या पवित्र भूमीत पार पाडला. सार्‍यांनाच उत्सुकता होती ती भारत श्री किताबाचा विजेता कोण असणार आणि या ग्लॅमरस स्पर्धेला सागर कातुर्डेच्या रुपाने विजेता लाभला. ही स्पर्धा इतकी थरारक  होती की स्पर्धेत खेळणार्‍या स्पर्धकांसह आणि जजेसनाही विजेता कोण ठरणार याची कल्पना नव्हती. प्रत्येक गटात मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाल्यामुळे प्रत्येक गटातील अव्वल खेळाडूची निवड करताना जजेसना चांगलीच कसरत करावी लागली.

दहा गटातील अव्वल खेळाडू भारत श्री किताबाच्या जेतेपदासाठी पोझिंगला उतरले तेव्हा विजेत्यांचा कुणाला अंदाज नव्हता. तेव्हा सागर याने सर्व्हिसेसच्या स्वप्निल नरवडकर, पीटी अनबन, मणिपूरचा रॉबी मैतेयी, महाराष्ट्राचा हरमित सिंग व उमेश गुप्ता व दिल्लीचा नवीन या तगड्या स्थितीत असलेल्या खेळाडूंवर मात करत विजेतेपदाला गवसणी घातली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात आयबीबीएफएफचे सरचिटणीस डॉ संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक संदीप सोनवणे यांनी सिंहाचा वाटा उचलला. स्पर्धेतील विजेत्यांना आयबीबीएफएफचे सरचिटणीस डॉ संजय मोरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे, साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर, डीवायएसपी शिरीष ओमनी, एअरपोर्ट अथॉरिटीचे डेप्युटी कमिशनर अमिष कुमार, शरीरसौष्ठव संघटनेचे अजय खानविलकर, राजेश सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला.

सर्व गटातील दहा गट विजेत्यांची दुबई येथे होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व गटविजेत्यांचा विमान प्रवासाचा खर्च डॉ. संजय मोरे हे उचलणार आहेत अशी घोषणा त्यांनी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *