
सार्थ सुभेदार, जसराज सिंग, जयंत पांडे चमकले
छत्रपती संभाजीनगर ः गुरुकुल क्रिकेट अकादमीतर्फे आंतर अकादमी क्रिकेट स्पर्धेत गुरुकुल जायंट्स संघाने गुरुकुल यलो आर्मी संघावर चुरशीच्या सामन्यात पाच विकेटने पराभव केला. या सामन्यात जसराज सिंग याने अष्टपैलू कामगिरी नोंदवत सामनावीर किताब मिळवला.

पडेगाव येथील डीवाय पाटील मैदानावर हा सामना झाला. गुरुकुल यलो आर्मी संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सात बाद १८४ धावसंख्या उभारली. गुरुकुल जायंट्स संघाने या धावसंख्येचा पाठलाग करताना १९.४ षटकात पाच बाद १८५ धावा फटकावत पाच विकेट राखून शानदार विजय साकारला.

या सामन्यात सार्थ सुभेदार याने शानदार शतक साजरे केले. त्याने अवघ्या ६२ चेंडूत १०३ धावा फटकावल्या. शतकी खेळीत त्याने २० चौकार व एक षटकार मारला. जसराज सिंग याने ३२ चेंडूत नाबाद ६० धावांची दमदार खेळी केली. त्याने पाच उत्तुंग षटकार व चार चौकार ठोकत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. जयंत पांडे याने ३१ चेंडूत ५२ धावांची वेगवान खेळी केली. त्याने दोन षटकार व नऊ चौकार मारले. गोलंदाजीत विराज झंपले (२-३९), आरव लोढा (१-८) व जसराज सिंग (१-१४) यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
संक्षिप्त धावफलक ः गुरुकुल यलो आर्मी ः २० षटकात सात बाद १८४ (सार्थ सुभेदार नाबाद १०३, एजी ९, स्वयम कदम ५, अतिश गावडे २०, अर्चित देशमुख नाबाद ८ इतर ३२, जसराज सिंग १-१४, आर्यन राजहंस १-३८, आर्यन मगर १-२५, आयुष बुगदे १-२४, आरव लोढा १-८, रणवीर यादव १-२३) पराभूत विरुद्ध गुरुकुल जायंट्स ः १९.४ षटकात पाच बाद १८५ (जयंत पांडे ५२, आयुष बुगदे २१, आदित्य बागुल नाबाद ३७, जसराज सिंग नाबाद ६०, इतर १४, विराज झंपले २-३९, अर्चिंत देशमुख १-३८, रुही १-२०, विराज कानडे १-३७). सामनावीर ः जसराज सिंग.