
सोलापूर ः बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेसाठी १७ वर्षांखालील गटात आर्या पोपट उमाप हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे.
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, बडोदा, विदर्भ आणि मुंबई हे संघ सहभागी आहेत. ३ ते १० एप्रिल दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी १ एप्रिलला महाराष्ट्र संघ अहमदाबादला रवाना होत आहे.
आर्याला स्नेहल जाधव, किरण मणियार, मानसी जाधव आणि सारिका कुरुलकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आर्याचे सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजीतसिंह मोहिते पाटील, संयुक्त सचिव धैर्यशील मोहिते पाटील व चंद्रकांत रेम्बर्सू यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.