
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रोइंग स्पर्धा
नाशिक : चंदीगड, पंजाब येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रोईंग स्पर्धेत नाशिकच्या अयोध्या रोईंग क्लबच्या रोइंगपटूनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचे प्रतिनिधीत्व करताना उत्कृष्ठ कामगीरी करून रौप्य पदक आणि कांस्य पदकाची कमाई केली.
या स्पर्धेत कृष्णा शेळके आणि राम शेळके या दोन बंधूंनी २ किलोमीटर या प्रकारात सुंदर कामगिरी करून कांस्य पदक प्राप्त केले. तसेच टीम इव्हेंटमध्ये कृष्णा शेळके, मोईन शेख, दिगंबर गवळी आणि सुमित गवळी यांनी ५०० मीटर अंतराच्या शर्यतीत अत्यंत चांगले एकत्रित प्रयत्न करून संघाला रौप्य पदक मिळवून दिले.
हे सर्व खेळाडू ऑलिम्पियन खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्या रोईंग क्लब येथे नियमित सराव करतात. दत्तू भोकनळ यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आम्हाला खूप फायदा झाला आणि आमचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळेच आम्ही चांगली कामगिरी करू शकलो असे दुहेरी पदक विजेता कृष्णा शेळके यांनी सांगितले.