
मुंबई ः रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित पाचव्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला प्रारंभ झाला असून स्पर्धेत ३०० पुरुष व महिला खेळाडूंमध्ये विजेतेपद पटकावण्यासाठी मोठी चुरस असणार आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, जुहू यांच्या सहयोगाने प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे पाचव्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या प्रसंगी रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चेतन देसाई, रोटरी क्लब पार्लेश्वरचे अध्यक्ष अविनाश मिश्रा, प्रभोदनकार ठाकरे क्रीडा संकुलचे विश्वस्त मकरंद येदुरकर, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे ईडी प्रमोद दुबे, महाराष्ट्र कॅरम संघटनेचे खजिनदार अजित सावंत, महाराष्ट्र कॅरम संघटनेचे सहसचिव केतन चिखले, क्लब कार्याध्यक्ष स्पोर्ट्स विवेक पै, प्रोजेक्ट कोऑर्डिनटर प्रसाद देवरुखकर व आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये पुरुष गटात २६० तर महिला गटात ४० स्पर्धक सहभागी झाले आहेत. स्पर्धेमध्ये ३ विश्व विजेते आणि जवळपास २५ आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. कॅरम चाहत्यांसाठी ही खऱ्या अर्थाने मेजवानीच ठरेल. स्पर्धे मधील सगळे सामने सुरको किंग लिमिटेड एडिशन बोर्डवर खेळवण्यात येत आहेत. स्पर्धेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय पंच परविंदर सिंग व रमेश चव्हाण प्रमुख पंच म्हणून काम पाहत आहेत.
पुरुष एकेरी पहिल्या फेरीचे काही निकाल
योगेश कोंडविलकर (रत्नागिरी) विजयी विरुद्ध दीपक घोलम (मुंबई उपनगर), २५-००, २५-००, सुपेश कामतेकर (मुंबई) विजयी विरुद्ध शॉन डायस (मुंबई उपनगर) २५-०८, २५-१५, पवन मेस्त्री (मुंबई) विजयी विरुद्ध सुदेश वाळके (मुंबई उपनगर) २५-०१, १८-२३, २५-०५, अनिल तायशेटे (सिंधुदुर्ग) विजयी विरुद्ध राकेश शेट्ये (मुंबई उपनगर) २५-०१, २५-१६, पंकज पवार (ठाणे) विजयी विरुद्ध रवींद्र राणे (पालघर) २५-०५, १९-०१, सागर वाघमारे (पुणे) विजयी विरुद्ध चिन्मय दांडगे (रायगड) २५-००, २५-००, ओंकार राणे (ठाणे) विजयी विरुद्ध अक्षय शिर्के (मुंबई उपनगर) २५-०७, २५-१७.