
पुरुष गटात भारताच्या अभय सिंगला उपविजेतेपद
मुंबई : जेएसडब्लू इंडियन ओपन स्क्वॉश स्पर्धेत महिला गटात १७ वर्षीय अव्वल मानांकित अनाहत सिंग हिने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत हेलेन टांगचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

बॉम्बे जिमखाना येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महिला गटात अंतिम फेरीत पहिल्या सेटमध्ये हेलेन कडवी झुंज दिली. पण अनाहत हिने सुरेख खेळ करत पहिला सेट हेलेन विरूद्ध ११-९ असा जिंकून १-० अशी आघाडी घेतली. अनाहत हिने दुसरा सेट ११-५ असा सहजव जिंकला व सामन्यावर भक्कम पकड निर्माण केली. तिसऱ्या सेटमध्ये आघाडीवर असलेल्या अनाहत हिने हाँगकाँगच्या हेलेन हिला कमबॅक करण्याची फारशी संधी दिली नाही व हा सेट अवघ्या १३ मिनिटात ११-८ असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. हा सामना २४ मिनिटे चालला. या विजेतेपदाबरोबर अनाहत हिला ३०० गुण मिळाले असून कारकिर्दीतील तिचे हे ११वे विजेतेपद आहे.
पुरुष गटात अंतिम सामन्यात इजिप्तच्या करीम एल टोर्की याने भारताच्या अभय सिंगचा ३-१ (१२-१०, ११-४, ७-११, १२-१०) असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना ८४ मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीसतोड खेळ केला. पण करीमने वर्चस्व कायम ठेवत हा सेट १२-१० असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये देखील करीमने आपली आघाडी कायम ठेवत ११-४ असा जिंकून आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये अभयने पुनरागमन करत हा सेट ११-७ असा जिंकून आघाडी कमी केली. चौथ्या सेटमध्ये अभयने करीमला जोरदार प्रतिकार केला. पण हा सेट करीमने १२-१० असा जिंकून विजय मिळवला. या विजेतेपदाबरोबर करीमला ५०० गुण देण्यात आले.
अंतिम निकाल
महिला गट ः अनाहत सिंग (भारत) विजयी विरुद्ध हेलेन टांग (हाँगकाँग) ३-० (११-९, ११-५, ११-८).
पुरुष गट : करीम एल टोर्की (इजिप्त) विजयी विरुद्ध अभय सिंग (भारत) ३-१ (१२-१०, ११-४, ७-११, १२-१०).