
अहमदाबाद ः एका सामन्याच्या बंदीचा अनुभव घेतल्यानंतर हार्दिक पंड्यात फारशी सुधारणा झाली नाही. यावेळी हार्दिकला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात हार्दिक बंदी असल्याने खेळू शकला नाही. आयपीएल २०२४ स्पर्धेत शेवटच्या सामन्यात स्लो ओव्हार रेटमध्ये हार्दिकवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यांची अंमलबजावणी आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात करण्यात आली.
आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात बंदी घालण्यात आल्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्ध पहिला सामना खेळणारा हार्दिक पंड्या पुन्हा एकदा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला आहे. यावेळी त्याला बंदी घालण्यात आलेली नाही. पण बोर्डाने निश्चितच मोठ्या प्रमाणात दंड ठोठावला आहे. दोषी आढळल्यानंतर त्याला आता १२ लाख रुपये भरावे लागतील.
हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ चांगली कामगिरी करेल आणि गुजरात संघाविरुद्ध विजय मिळवेल अशी क्रिकेटप्रेमींना आशा होती. पण संघाला विजयही मिळाला नाही. त्याशिवाय, कर्णधाराला दंड देखील ठोठावण्यात आला.
मुंबईच्या गोलंदाजांना निर्धारित वेळेत गोलंदाजीचा त्यांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यानंतर त्यांना शेवटच्या षटकात ३० यार्ड सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक कमी ठेवावा लागला. याशिवाय, आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत चालू हंगामात संघाचा हा पहिलाच गुन्हा आहे. अशा परिस्थितीत पांड्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.