
टी २०, एकदिवसीय आणि कसोटी सामना खेळणार
मुंबई ः भारतीय महिला क्रिकेट संघ पुढील वर्षाच्या सुरुवातीला तिरंगी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात मार्चमध्ये पर्थमधील वाका मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकमेव कसोटी सामना देखील खेळवला जाईल. भारतीय संघाचा दौरा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि ९ मार्चपर्यंत चालेल. या काळात संघ तीन टी २० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका देखील खेळेल.
या मालिकेची सुरुवात १५ फेब्रुवारी रोजी सिडनी येथे पहिल्या टी २० सामन्याने होईल. त्यानंतर, पुढील दोन सामने मनुका ओव्हल आणि अॅडलेड ओव्हल येथे खेळले जातील. एकदिवसीय मालिका २४ मार्च रोजी ब्रिस्बेनमधील अॅलन बॉर्डर फील्डवर सुरू होईल, त्यानंतर पुढील दोन सामने २७ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी होतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव कसोटी सामना ६ ते ९ मार्च दरम्यान पर्थमधील वाका मैदानावर खेळला जाईल.
२०२५-२६ हा हंगाम गेल्या नोव्हेंबरमध्ये जारी झालेल्या नवीन आयसीसी महिला भविष्य दौऱ्या कार्यक्रमांतर्गत पहिला असेल आणि २०२९ पर्यंत चालेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) २०२६ वरून जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्यामुळे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ही मालिका फेब्रुवारी-मार्चपर्यंत हलवावी लागली, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये डे-नाईट अॅशेस कसोटीचे आयोजन करणारे मेलबर्न क्रिकेट मैदान आगामी नूतनीकरणाच्या कामांमुळे उपलब्ध नव्हते, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. वाका मैदानाचे आधुनिकीकरण मोहीम सुरू आहे ज्यामुळे ते १० हजार प्रेक्षकांच्या क्षमतेच्या एका भव्य ठिकाणी रूपांतरित होईल आणि या वर्षाच्या अखेरीस ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाने फेब्रुवारी २०२४ मध्ये वाका येथे महिलांची शेवटची कसोटी खेळली होती, जेव्हा त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि २८४ धावांनी विजय मिळवला होता.
मालिकेचे वेळापत्रक
टी २० मालिका
१५ फेब्रुवारी : एससीजी, सिडनी
१९ फेब्रुवारी : मनुका ओव्हल, कॅनबेरा
२१ फेब्रुवारी : अॅडलेड ओव्हल, अॅडलेड
एकदिवसीय मालिका
२४ फेब्रुवारी : अॅलन बॉर्डर फील्ड, ब्रिस्बेन
२७ फेब्रुवारी : बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट
१ मार्च : सिटीपॉवर सेंटर, मेलबर्न
एकमेव कसोटी सामना
६ ते ९ मार्च : वाका स्टेडियम, पर्थ (दिवस-रात्र).