
कर्णधार श्रीवत्स कुलकर्णीची अष्टपैलू कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमसीए अंडर १९ दोन दिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावात सर्वबाद २८६ धावसंख्या उभारली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या सीएनए संघाने चार बाद १३४ धावा काढल्या आहेत.
एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. सीएनए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर संघाने पहिल्या डावात ६३ षटकात सर्वबाद २८६ धावा काढल्या. राम राठोड (०) गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर रुद्राक्ष बोडके याने आक्रमक ७० धावा फटकावत डावाला आकार दिला. त्याने ८९ चेंडूंचा सामना करत नऊ चौकार व दोन उत्तुंग षटकार ठोकत आपला ठसा उमटवला. जय हारदे याने चार चौकारांसह २२ धावा फटकावल्या.
वीर राठोड (२१), राघव नाईक (१३) हे लवकर बाद झाले. रोहित पाटील याने ६८ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. त्याने पाच चौकार व एक षटकार मारला. कर्णधार श्रीवत्स कुलकर्णी याने ६६ चेंडूत ५४ धावांची शानदार खेळी केली. त्याने दोन उत्तुंग षटकार व आठ चौकार मारले.
श्रीनिवास लेहेकर ९ धावांवर बाद झाला. सुमित सोळुंके याने ३९ चेंडूत नाबाद ३१ धावा फटकावल्या. त्याने चार चौकार मारले. अविनाश साह ३, जैद पटेल २ धावांवर बाद झाले.
सीएनए संघाकडून कृष्णकांत चव्हाण (२-३४), आदित्य भट्ट (२-३९), स्पर्श बोरकर (२-६०), प्रद्युम्न अटपाडकर (२-२५) यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी दोन गडी बाद केले.
सीएनए संघाने २७ षटकांच्या खेळात चार बाद १३४ धावा काढल्या. सार्थक करोसिया याने सर्वाधिक ६७ धावा काढल्या. तो रिटायर्ड हर्ट झाला. त्याने १२ चौकार मारले. अंश मिश्रा (१८), तन्मय शुक्ला (१९) यांनी आपले योगदान दिले. स्पर्श बोरकर ६ तर कृष्णा पांडे ६ धावांवर खेळत आहेत.
छत्रपती संभाजीनगर संघाकडून कर्णधार श्रीवत्स कुलकर्णी याने २६ धावांत दोन विकेट घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. जय हारदे याने १८ धावांत दोन गडी बाद केले.