
दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलग दुसरा विजय, फाफ डु प्लेसिसचे आक्रमक अर्धशतक
विशाखापट्टणम : मिचेल स्टार्क (५-३५) याचा घातक स्पेल आणि फाफ डु प्लेसिस (५०) याचे आक्रमक अर्धशतक या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने सात विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. आयपीएल स्पर्धेतील दिल्लीचा हा सलग दुसरा विजय आहे तर हैदराबाद सनरायझर्स संघाचा सलग दुसरा पराभव आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघासमोर विजयासाठी १६४ धावांची गरज होती. दिल्ली कॅपिटल्स संघाने १६ षटकात तीन बाद १६६ धावा फटकावत सात विकेट राखून मोठा विजय संपादन केला. जेक फ्रेझर-मॅकगर्क व फाफ डू प्लेसिस या सलामी जोडीने धमाकेदार सुरुवात केली. या सलामी जोडीने ८१ धावांची भागीदारी करुन संघाचा विजय सुकर बनवला. फाफ डु प्लेसिस याने अवघ्या २७ चेंडूत ५० धावा काढल्या. त्याने तीन उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. फ्रेझर याने दोन षटकार व चार चौकारांसह ३८ धावा फटकावल्या.

केएल राहुल याने पहिला सामना खेळताना पाच चेंडूत १५ धावा काढल्या. राहुलने दोन चौकार व एक षटकार मारला. अभिषेक पोरेल याने १८ चेंडूत नाबाद ३४ धावा फटकावल्या. त्याने दोन षटकार व दोन चौकार मारले. ट्रिस्टन स्टब्स याने १४ चेंडूत नाबाद २१ धावांचे योगदान दिले. त्याने तीन चौकार मारले. झीशान अन्सारी याने ४२ धावांत तीन विकेट घेतल्या.
मिचेल स्टार्कची घातक गोलंदाजी
पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय दिल्लीच्या गोलंदाजांनी चुकीचा सिद्ध केला. पहिल्याच षटकात अभिषेक शर्मा धावबाद झाला आणि त्यानंतर मिचेल स्टार्क याने इशान किशन, नितीश कुमार रेड्डी आणि ट्रॅव्हिस हेड यांचे बळी घेत हैदराबादची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली.
दिल्ली कॅपिटल्स संघाकडून मिचेल स्टार्क याने पहिले षटक टाकले. या षटकात सलग दोन चौकार मारल्यानंतर ट्रॅव्हिस हेडला पाचव्या चेंडूवर एक धाव घ्यायची होती पण समन्वयाच्या अभावामुळे अभिषेक शर्मा धावबाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला इशान किशन पुन्हा एकदा फ्लॉप झाला. तो फक्त २ धावा काढल्यानंतर मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर विकेटच्या मागे झेलबाद झाला.
३७ धावांवर ४ विकेट गमावल्या
सनरायझर्स हैदराबादचे स्फोटक फलंदाज मिशेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशानला बाद केल्यानंतर, स्टार्कने त्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नितीश कुमार रेड्डी (०) याला अक्षर पटेलकडून झेलबाद केले. चौथी विकेट ३७ धावांवर ट्रॅव्हिस हेडच्या रूपात पडली, त्याला देखील स्टार्कने बाद केले.

अनिकेत वर्माची शानदार फलंदाजी
जर अनिकेत वर्माने ७४ धावांची शानदार खेळी केली नसती तर सनरायझर्स हैदराबादने कदाचित फक्त ११०-१२० धावाच केल्या असत्या. त्याने ४१ चेंडूत ५ चौकारांसह ७४ धावा केल्या. त्याने क्लासेनसोबत ७७ धावांची भागीदारी केली. क्लासेनने १९ चेंडूत ३२ धावा केल्या आणि मोहित शर्माने त्याला झेलबाद केले.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने असा झेल घेतला की तो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. स्टार्कने टाकलेल्या १८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हर्षल पटेलने शॉट खेळला, अक्षर पटेलने डायव्ह करून झेल घेतला. या हंगामात आयपीएलमध्ये घेतलेला हा सर्वात कठीण झेल होता.
मिचेल स्टार्कची सर्वोत्तम कामगिरी
वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सामन्यात ५ विकेट्स घेतल्या, आयपीएलमधील हा त्याचा पहिलाच पाच विकेट्सचा टप्पा आहे. त्याने ३.४ षटकांच्या स्पेलमध्ये ९.५५ च्या इकॉनॉमीने ३५ धावा दिल्या. त्याने ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, विलेम मुल्डर आणि हर्षल पटेल यांच्या विकेट घेतल्या. कुलदीप यादवनेही ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने अनिकेत वर्माचा मोठा बळी घेतला, जो धोकादायक दिसत होता. याशिवाय त्याने अभिनव मनोहर आणि पॅट कमिन्स यांचे बळी घेतले. कुलदीपने ४ षटकांत फक्त २२ धावा दिल्या.