राजस्थानचा चेन्नईवर ‘रॉयल’ विजय 

  • By admin
  • March 30, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

नितेश राणा, वानिंदु हसरंगा विजयाचे हिरे, रुतुराज गायकवाडची एकाकी झुंज 

 गुवाहाटी : नितीश राणा (८१) व वानिंदु हसरंगा (४-३५) यांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलच्या नव्या हंगामात सलग दोन पराभवानंतर स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. राजस्थान संघाने रोमांचक सामना अवघ्या सहा धावांनी जिंकत गुणांचे खाते उघडले. रुतुराज गायकवाडने (६३) एकाकी झुंज दिली. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे. 

चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर विजयासाठी १८३ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईची सलामी जोडी रचिन रवींद्र आणि राहुल त्रिपाठी मैदानात उरतली. जोफ्रा आर्चर याने पहिल्याच षटकात रचिन रवींद्र याला शून्यावर बाद करुन चेन्नईला मोठा धक्का दिला. ध्रुव जुरेल याने त्याचा झेल टिपला. त्यानंतर राहुल त्रिपाठी व कर्णधार रुतुराज गायकवाड या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची ‌भागीदारी केली. हसरंगा याने ही धोकादायक बनत चाललेली जोडी फोडली. राहुल २३ धावांवर बाद झाला. त्याने तीन चौकार व एक षटकार मारला. 


चेन्नई संघाला १०व्या षटकात मोठा धक्का बसला. आक्रमक फलंदाज शिवम दुबे १८ धावांवर बाद झाला. त्याने दोन उत्तुंग षटकार व एक चौकार मारला. हसरंगाच्या गोलंदाजीवर रियान पराग याने त्याचा उत्कृष्ट झेल टिपला. ७२ धावांवर चेन्नईला तिसरा धक्का बसला. पाठोपाठ हसरंगा याने विजय शंकरला (९) स्वस्तात बाद करुन सामन्यातील तिसरा बळी मिळवला. 

एका बाजूने विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने कर्णधार रुतुराज गायकवाड याने शानदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. हसरंगा याने सामन्यातील चौथा बळी घेताना गायकवाडची आक्रमक ६३ धावांची खेळी संपुष्टात आणली. गायकवाडने ७ चौकार व एक षटकार मारला. हसरंगा याने ३५ धावांत चार विकेट घेऊन चेन्नई संघावर मोठा दबाव आणला. गायकवाड बाद झाल्यानंतर धोनी मैदानात उतरला. 


रवींद्र जडेजा व धोनीने आक्रमक फलंदाजी करत विजयाच्या आशा कायम ठेवली. २०व्या षटकात पहिल्याच चेंडूवर धोनीने मारलेला जोरदार फटका सीमारेषेवर हेटमायर याने अप्रतिम टिपला आणि धोनी (१६) तंबूत परतला. धोनी बाद झाला आणि चेन्नईच्या विजयाची शक्यता संपुष्टात आली. रवींद्र जडेजाने नाबाद ३२ धावा फटकावत सामन्यातील रोमांच शेवटपर्यंत कायम ठेवला. जेमी ओव्हरटन याने ४ चेंडूत एक षटकार ठोकत ११ धावांचे योगदान दिले. २० षटकात चेन्नईने सहा बाद १७६ धावा काढल्या. हसरंगा याने ३५ धावांत चार विकेट घेऊन संघाचा विजय सुकर बनवला. आर्चर (१-१३), संदीप शर्मा (१-४२) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 

राजस्थान रॉयल्स ९ बाद १८२ 

बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या ११ व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर १८३ धावांचे लक्ष्य ठेवले. एक काळ असा होता जेव्हा राजस्थान संघ २२० धावसंख्येपर्यंत सहज पोहोचू शकेल असे वाटत होते. पण चेन्नईच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये शानदार पुनरागमन केले. राजस्थान रॉयल्सला शेवटच्या ८ षटकांत फक्त ५३ धावा जोडता आल्या, तर १२ षटकांनंतर संघाचा स्कोअर तीन बाद १२९ असा होता. त्याआधी, नितीश राणाने ८१ धावांची जलद खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.

नितीश राणाची शानदार खेळी 
यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांनी राजस्थान रॉयल्सच्या डावाची सुरुवात केली. पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वाल (४) खलील अहमदने झेलबाद केला. त्यानंतर, नितीश राणाने संजूसोबत मिळून ८२ धावांची भागीदारी केली. १६ चेंडूत २० धावा काढून संजू बाद झाला.

राजस्थान रॉयल्सकडून नितीश राणाने शानदार खेळी केली, त्याने ३६ चेंडूत ५ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. त्याने रियान परागसोबत ३८ धावांची भागीदारी केली. त्याचा चांगला डाव अश्विनने संपवला.

शेवटच्या ८ षटकांत पुनरागमन
१२ षटकांनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोअर तीन बाद १२९ असा होता. त्यानंतर, चेन्नईच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. रवींद्र जडेजाने १३ व्या षटकात फक्त ५ धावा दिल्या. यानंतर, नूर अहमदने १४ व्या षटकात फक्त ६ धावा दिल्या आणि ध्रुव जुरेलची विकेटही घेतली. हसरंगाच्या विकेटसह, जडेजाने १५ व्या षटकात फक्त ५ धावा दिल्या. १६ व्या षटकात मथिशा पाथिरानाने ८ धावा दिल्या. चौकारांच्या कमतरतेमुळे, राजस्थान सामन्यात मागे राहिला. १८ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मथिशा पाथिरानाने रियान पराग याला बाद केले. मागच्या चेंडूवर, पाथिरानाचा वेगवान चेंडू परागच्या हाताला लागला होता, त्यानंतर सामना काही काळ थांबवण्यात आला. शेवटच्या षटकात पाथिरानाने फक्त ७ धावा दिल्या आणि १ विकेट घेतली. राजस्थान रॉयल्सचा डाव १८२ धावांवर संपला. शेवटच्या ८ षटकांत राजस्थानला ६ विकेट गमावून फक्त ५३ धावा करता आल्या.

खलील अहमदने ४ षटकांत ३८ धावा देत २ बळी घेतले. नूर अहमदने ४ षटकांच्या स्पेलमध्ये २८ धावा देत २ बळी घेतले. पाथिरानानेही ४ षटकांत २ बळी आणि २८ धावा दिल्या. अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी १ विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *