नागपूरचा जलतरणपटू अपूर्व गोरले याने पटकावले सुवर्णपदक

  • By admin
  • March 31, 2025
  • 0
  • 70 Views
Spread the love

आंतरराष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी

नागपूर (सतीश भालेराव) : नागपूरचा जलतरणपटू अपूर्व गोरले याने क्रबी बीच थायलंड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सागरी जलतरण १० किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवत सुवर्ण पदक प्राप्त केले. त्याने हे अंतर ४:२२:१४ मिनिटात पार केले. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा ओशनमॅन ही संस्था आयोजित करते.

या स्पर्धेत जगभरातील २४ देशांचे ७४ जलतरणपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत समुद्री लाटांच्या विरुद्ध दिशेने पोहायचे असते. ही अत्यंत कठीण स्पर्धा असते. अपूर्व गोरले याने जर्मनीच्या उलरिच नेटलर व थायलंडच्या मनोच फोनियुंसंग या खेळाडूंना मागे टाकत ही स्पर्धा जिंकली. अपूर्व गोरले हा भारताचा सर्वात कमी वयाचा जलतरणपटू आहे. तो केवळ ८ महिन्यांचा असताना त्याने पोहणे शिकले होते. वयाच्या १२ व्या वर्षी त्याने धरमतर जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया हे ३५ किमी सागरी अंतर पार केले होते. वयाच्या १६व्या वर्षी अपूर्व याने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले होते.

अपूर्व याने विविध जलतरण स्पर्धेमध्ये आजवर शंभरपेक्षा अधिक पदके जिंकलेली आहेत. एनआयएस प्रशिक्षक डॉ प्रवीण लामखाडे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे. अपूर्व याचे प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सेंटर पॉईंट स्कूल नागपूर येथे झाले आहे. त्याने सिंहगड इंजिनीअरिंग कॉलेज लोणावळा, पुणे येथून बीइ मेकॅनिकल पदवी प्राप्त केली आहे. आज अपूर्व हा मुव्ह इन सिंक या बंगळुरू येथील आयटी कंपनीत असोसिएट डायरेक्टर या पदावर कार्यरत आहे.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *