
शिवनेरी टीमला उपविजेतेपद, अजिंक्यतारा संघ तृतीय स्थानावर
सोलापूर ः रामशेज गड संघाने मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. शिवनेरी संघाने उपविजेते संपादन केले आणि अजिंक्यतारा संघाने तृतीय स्थान मिळवले.
येथील विजापूर रोडवरील शासकीय मैदानावर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ग्रामीण विभागातील उत्तर सोलापूर तालुक्यातील काकासाहेब काळे यांच्या रामशेज गड संघाने शहरातील मुन्ना वानकर यांच्या शिवनेरी संघाचा पराभव करत सिझन २ चे विजेतेपद पटकाविले. त्यांना राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वडील लखोजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव (सिंदखेडराजा) यांच्या हस्ते मानाचा प्रथम क्रमांकाचा विजयराव मुळीक यांच्या स्मरणार्थ चषक तसेच १ लाख ३९५ रुपयाचे रोख पारितोषक देण्यात आले. उपविजेत्या शिवनेरी संघाला देविदास पवार यांच्या स्मरणार्थ चषक व रोख ५० हजार ३९५ रुपये आणि तृतीय क्रमांकांचे बक्षीस अंबादास पवार यांच्या स्मरणार्थ चषक व रोख २५ हजार ३९५ रुपये पेनुरचे रणजीत चवरे यांच्या अजिंक्यतारा संघाला देण्यात आले.
यावेळी प्रमुख मान्यवर माजी आमदार दिलीप माने, श्रीकांत मोरे, अनंत जाधव, रवी भोपळे, सुनील जाधव, योगेश गवळी, विक्रांत पवार, राम साठे, नामदेव पवार, श्रद्धा जवंजाळ, दत्तामामा मुळे, विनोद भोसले, आयोजक प्रशांत बाबर यांच्यासमवेत सर्व संघाचे मालक आणि प्रायोजक उपस्थित होते.
त्यापूर्वी, पहिल्या उपांत्य सामन्यात शहरी विभागातील शिवनेरी संघाने सिंधुदुर्ग संघावर ६ गड्यांनी विजय प्राप्त केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ग्रामीण विभागातील रामशेज गड संघाने अजिंक्यतारा संघावर ६ धावांनी मात केली. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात अजिंक्यतारा संघाने सिंधुदुर्ग ५० धावांनी हरविले.
या सामन्यांसाठी पंच म्हणून इर्षाद बिराजदार, महेश सोनवणे यांनी काम पाहिले. गुणलेखक म्हणून मिलिंद गोरे व गेनबा सुरवसे यांनी काम पाहिले. सामन्यांचे धावते वर्णन वीरेश कोळी व मनीष काळे यांनी केले. बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन शंकर पवार यांनी केले. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी संयोजक सागर गव्हाणे, राजा जाधव, अमोघ जगताप, शंकर पवार यांचे सहकार्य लाभले. या संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण युट्युबवर स्टुडिओ स्पोर्ट्स मार्फत करण्यात आले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
मालिकावीर ः विजय वीर, फलंदाज ः विठ्ठल चव्हाण, गोलंदाज ः माऊली सिंरसट, क्षेत्ररक्षक ः सौरभ जाधव, यष्टिरक्षक ः आकाश चव्हाण, झेल ः प्रथमेश माने.