
नाशिक ः नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन संचलित स्व. सुरेखा ताई भोसले निवासी खो-खो प्रबोधिनीच्या पाच खेळाडूंची पुरुष आणि महिला गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी विविध तीन संघात निवड झाली आहे.
ही स्पर्धा जगन्नाथ पुरी ओडिशा येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेसाठी दिलीप खांडवी, मनीषा पडेर, वृषाली भोये, निशा वैजल, कौसल्या पवार या पाच खेळाडूंची वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनच्या ५० वर्षाच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी पाच खेळाडूंची निवड राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली आहे. विशेष म्हणजे हे पाच खेळाडू या स्पर्धेत तीन वेगळ्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
दिलीप खांडवी हा भारतीय रेल्वे संघाचे, मनीषा पडेर महाराष्ट्राचे तर वृषाली भोये, निशा वैजल, कौसल्या पवार भारतीय विमानतळ प्राधिकरण, स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड यांचे प्रतिनिधित्व करणार आहे. दिलीप खांडवी, वृषाली भोये, कौसल्या पवार यांची ही सलग तिसरी वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धा आहे.