
अंतिम सामन्यात ग्रँडमास्टर मित्रबा गुहाकडून पराभव
नाशिक ः नाशिकचा उदयोन्मुख स्टार फिडे मास्टर कैवल्य नागरे याने रांची (झारखंड) येथे झालेल्या राष्ट्रीय ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावत सातवे स्थान मिळवले. या स्पर्धेत कैवल्य याने साडेआठ गुणांची कमाई करत लक्षवेधक कामगिरी नोंदवली.
या स्पर्धेत कैवल्य नागरे याने धमाकेदार कामगिरी केली. कैवल्य याने ग्रँडमास्टर दीप्तयान घोष, रॅपिड राष्ट्रीय विजेता ग्रँडमास्टर इनियन पी आणि ग्रँडमास्टर श्याम निखिल यांना पराभूत करुन एकच खळबळ उडवून दिली. आंतरराष्ट्रीय मास्टर सर्वना कृष्णन व आंतरराष्ट्रीय मास्टर आराध्य गर्ग यांना कैवल्य याने पराभूत केले. आंतरराष्ट्रीय मास्टर नितीन एस याच्याविरुद्ध कैवल्यचा डाव बरोबरीत राहिला. शेवटच्या डावात ग्रँडमास्टर मित्राबा गुहा याच्याकडून अटीतटीच्या सामन्यात कैवल्यला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे कैवल्य याला चॅम्पियन होण्याची संधी थोडक्यात हुकली.
कैवल्यच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची धोरणात्मक क्षमताच दिसून आली नाही तर त्याच्या एलो रेटिंगमध्ये २०२ गुणांनी अविश्वसनीय वाढ झाली आहे. तर राष्ट्रीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत देखील ७.५ गुणांची कमाई करत आपला आलेख सरस ठेवण्यात कैवल्यला यश मिळाले आहे. कैवल्यची मेहनत, समर्पण आणि बुद्धिबळाबद्दलची आवड खरोखरच फळाला आली आहे. नाशिक तसेच राज्यभरातून त्याच्या कामगिरीचे कौतुक बुद्धिबळ रसिकांनी केले. त्याचे पालक त्याच्या पुढील ध्येयनिश्चितीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. तर प्रसार माध्यमाशी बोलताना विचारलेल्या प्रश्नात स्थानिक व राज्य संघटनेने अश्या उदयोन्मुख विद्यार्थ्यांसाठी दक्षिण भारतीय राज्याप्रमाणे भूमिका अजूनही का घेतली नाही यावर त्याच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक मधील नागरे बुद्धिबळ परिवाराची ही लढाई नाशिक आणि महाराष्ट्रातील बुद्धिबळ खेळाडू आणि पालक यांना प्रेरणा देणारी आहे. कैवल्य आणि त्याच्या परिवाराचे बुद्धिबळ क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.