
गुवाहाटी ः चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्धच्या सामन्याता राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकी गोलंदाज वानिंदु हसरंगा याने इतिहास रचला. आयपीएल इतिहासात हे फक्त तिसऱयांदा घडले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलच्या नव्या हंगामात पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करून चांगली सुरुवात केली होती. पण तेव्हापासून चेन्नई संघाने सलग २ सामने गमावले आहेत. चेन्नईला त्यांच्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पराभव पत्करावा लागला आणि आता तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, राजस्थान रॉयल्सने नितीश राणाच्या शानदार फलंदाजी आणि लेग-स्पिनर वानिंदू हसरंगाच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईचा ६ धावांनी पराभव करून हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला.
हसरंगाच्या नावावर झाला मोठा विक्रम
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने नितीश राणाच्या ८१ धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नई संघ निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून केवळ १७६ धावा करू शकला. राजस्थानचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाने चेन्नईच्या फलंदाजांना रोखण्यात मोठी भूमिका बजावली, त्याने ४ षटकांच्या कोट्यात फक्त ३५ धावा देऊन ४ फलंदाजांचे बळी घेतले आणि आयपीएलमध्ये आपल्या नावावर एक खास विक्रम केला.
हसरंगाने राहुल त्रिपाठी, चेन्नईचा कर्णधार रुतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि विजय शंकर यांचे बळी घेतले. अशाप्रकारे, तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात ४ विकेट घेणारा तिसरा फिरकी गोलंदाज ठरला. याआधी फक्त हरभजन सिंग (५-१८) आणि ब्रॅड हॉग (४-२९) यांनीच ही महान कामगिरी केली होती. एवढेच नाही तर, हसरंगा हा राजस्थानचा दुसरा गोलंदाज आहे ज्याने सीएसके विरुद्ध आयपीएल सामन्यात ४ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. याआधी २००८ च्या आयपीएलमध्ये सोहेल तन्वीरने १४ धावा देऊन ६ विकेट घेतल्या होत्या.