
नऊ वेळेस ही स्पर्धा पूर्ण करणारा सागर एकमेव स्पर्धक
छत्रपती संभाजीनगर ः ३४व्या वीर सावरकर राष्ट्रीय समुद्री स्पर्धा छत्रपती संभाजीनगरचा दिव्यांग आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सागर बडवे याने सहा तास ४६ मिनिटांत यशस्वीरित्या पूर्ण केली.
ही स्पर्धा गुजरात सरकारच्या युवा कला व क्रीडा विभाग तसेच हरी ओम आश्रम सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली होती. मुलांसाठी चोरवाड ते वेरावळ असे २१ नॉटिकल माइल्स म्हणजे अंदाजे ३८ किलोमीटर अंतर होते.
या स्पर्धेत भारतातून निवडक २५ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तरुण मुलांमध्ये सागर बडवे हा एकमेव दिव्यांग आणि ३५ प्लस वयोगटातील जलतरणपटू होता. सागर बडवे याने ही स्पर्धा सर्वांबरोबर वेळेत पूर्ण केली.
२००८ पासून एकूण नऊ वेळेस ही स्पर्ध यशस्वीपणे पूर्ण करणारा सागर बडवे हा एकमेव स्पर्धक आहे. या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी जडेजा, जिल्हा क्रीडा अधिकारी हरीश मकवाना यांनी सागर बडवे याचे विशेष कौतुक केले.
सागर बडवे हा सध्या एमपीपी स्पोर्ट्स पार्क या ठिकाणी मुख्य जलतरण प्रशिक्षक आणि विहंग शाळेतील विशेष मुलांना जलतरण प्रशिक्षण देत आहे. सागरचे अनेक विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. या कामगिरीबद्दल सागरचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.