
गुवाहाटी ः राजस्थान रॉयल्स संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसन याने त्याच्या विकेटकिपिंगवर लादलेली बंदी उठवण्यासाठी बीसीसीआयची मदत मागितली आहे. चेन्नई संघावर विजय मिळवल्यानंतर संजू थेट बंगळुरुला रवाना झाला. या ठिकाणी संजू सेंटर ऑफ एक्सलन्स येथे त्याची फिटनेस टेस्ट देणार आहे.
बीसीसीआयसोबत केंद्रीय करारबद्ध असलेल्या संजू सॅमसनच्या तंदुरुस्तीबाबत काही शंका आहे. आयपीएलपूर्वी संजू सॅमसनच्या उजव्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याला आयपीएल २०२५ च्या पहिल्या तीन सामन्यांसाठी बीसीसीआयने अंशतः मान्यता दिली. या मंजुरीमध्ये अट होती की तो विकेटकीपिंग करणार नाही, हेच कारण आहे की संजू आतापर्यंत हंगामात राजस्थानसाठी फक्त फलंदाज म्हणून खेळताना दिसत आहे. रियान परागने पहिल्या ३ सामन्यांमध्ये राजस्थानचे नेतृत्व केले आहे.
संजू १०० टक्के तंदुरुस्त
रिपोर्ट्सनुसार, संजू सॅमसनच्या अंगठ्याची दुखापत पूर्णपणे बरी झाली आहे. याचा अर्थ आता तो विकेटकीपिंगसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे असे वाटते. जर त्याला सीओई मधील वैद्यकीय तज्ज्ञांकडून हिरवा कंदील मिळाला, तर तो आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांमध्ये पुन्हा एकदा यष्टीरक्षकाव्यतिरिक्त कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारताना दिसू शकतो.
राजस्थान रॉयल्सची संमिश्र सुरुवात
राजस्थान रॉयल्सची या हंगामात सुरुवात संमिश्र झाली आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर राजस्थान संघाने गुवाहाटीमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्धच्या सामन्यात चुरशीचा विजय मिळवला. आता राजस्थानचा पुढील सामना ५ एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध होईल. त्यानंतर, ९ एप्रिल रोजी राजस्थानचा सामना अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सशी होईल.