
अश्वनी कुमारचे आयपीएल पदार्पण अविस्मरणीय; रायन रिकेल्टनचे धमाकेदार अर्धशतक
मुंबई : आयपीएल स्पर्धेत पहिला सामना खेळणाऱ्या अश्वनी कुमारच्या (४-२४) घातक गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने गतविजेत्या केकेआर संघाचा ७.१ षटके आणि आठ विकेट राखून पराभव करत स्पर्धेतील पहिला दणदणीत विजय नोंदवला. दोन सलग पराभवानंतर घरच्या मैदानावर मिळवलेला हा विजय मुंबई संघात जोश निर्माण करणारा ठरेल.
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स संघाला विजयासाठी फक्त ११७ धावांचे लक्ष्य होते. जॉन्सन व राणा या वेगवान गोलंदाजांनी रोहित शर्मा व रायन रिकेल्टन या सलामी जोडीची कठोर परीक्षा घेतली. चेंडू स्विंग होत असल्याने सलामी जोडी चाचपडत होती. आंद्रे रसेल याने १३ धावांवर रोहित शर्माला बाद करुन मुंबईला पहिला धक्का दिला. रोहितच्या फ्लॉप कामगिरी कायम राहिली. रोहित बाद झाला तेव्हा मुंबईची धावसंख्या ४६ होती.

दोन सामन्यात स्वस्तात बाद झालेल्या रायन रिकेल्टन याने आक्रमक फलंदाजी करत धावगती कायम ठेवली. विल जॅक्स याने १७ चेंडूत १६ धावा फटकावल्या. त्याने एक षटकार मारला. या जोडीने ४५ धावांची भागीदारी करत संघाला विजयसमीप आणले. रसेल याने जॅक्सला बाद करुन दुसरा बळी मिळवला.
रायन रिकेल्टन याने ४१ चेंडूत नाबाद ६२ धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने आपल्या वेगवान खेळीत पाच उत्तुंग षटकार व चार चौकार ठोकले. सूर्यकुमार यादव याने ९ चेंडूत नाबाद २७ धावांची दमदार खेळी साकारली. त्याने दोन षटकार व तीन चौकार मारले. मुंबईने १२.५ षटकात दोन बाद १२१ धावा फटकावत आठ विकेटने सामना जिंकला. रसेल याने ३५ धावांत दोन गडी बाद केले.
केकेआर ११६ धावांत गारद
मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला फक्त ११६ धावांवर रोखले. या सामन्यात मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या अश्वनी कुमार याने पदार्पणाच्या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या. पहिल्या षटकापासून केकेआर संघ अडचणीत दिसत होता. कोलकाता संघाची अवस्था इतकी वाईट होती की संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज अंगकृष रघुवंशी होता. त्याने २६ धावा काढल्या.
मुंबईचा निर्णय अचूक ठरलावानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सहसा येथे मोठे धावसंख्या उभारली जाते, परंतु मुंबईच्या घातक गोलंदाजीसमोर केकेआर संघाची आक्रमक फलंदाजांची फळी संघर्ष करताना दिसली. परिस्थिती अशी होती की केकेआरचा अर्धा संघ ४५ धावांवरच पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या सामन्यात पुनरागमन करणारा सुनील नारायण पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्ट याने क्लीन बोल्ड केला.
करोडो रुपयांचे खेळाडू फ्लॉप झाले
आयपीएल २०२५ मध्ये कोलकाता संघात अनेक महागडे खेळाडू आहेत. लिलावात २३.७५ कोटी रुपयांना विकला गेलेला वेंकटेश अय्यर ९ चेंडू खेळला पण त्याला फक्त ३ धावा करता आल्या. रिंकू सिंगला कोलकाताने १३ कोटी रुपयांना रिटेन केले होते, परंतु त्यालाही त्याच्या बॅटमधून फक्त १७ धावा काढता आल्या. मुंबईने एकूण ६ गोलंदाजांचा वापर केला आणि सर्व ६ गोलंदाजांनी किमान एक बळी घेतला. अश्वनी कुमारने ४ तर दीपक चहरने २ विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट, हार्दिक पंड्या, विघ्नेश पुथूर आणि मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अश्वनी कुमार याने पहिला सामना खेळताना चार विकेट घेऊन चर्चेचा केंद्रबिंदू बनला. डावखुऱ्या अश्वनी कुमार याने घातक गोलंदाजी केली. मनीष पांडे व आंद्रे रसेल यांना त्याने क्लीन बोल्ड बाद करुन आपल्या वेगाची क्षमता दाखवली.
केकेआरने ८८ धावांवर ८ विकेट गमावल्या होत्या आणि एके क्षणी संघाला १०० धावांचा टप्पा गाठणे देखील कठीण वाटत होते. पण रमनदीप सिंगने १२ चेंडूत २२ धावांची जलद खेळी केली आणि केकेआरचा स्कोअर ११६ धावांवर नेला.