
क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयाला मिळणार नवा आयाम ः प्रमोद वाघमोडे
ठाणे : महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे संलग्नित ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या माध्यमातून रविवारी (६ एप्रिल) एम एच विद्यालय, ठाणे येथे सकाळी ११ वाजता ठाणे जिल्ह्यातील, ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, उल्हासनगर, नवी मुंबई व मीरा भाईंदर या सहा महानगरपालिका तसेच कल्याण, शहापूर, भिवंडी, ठाणे, मुरबाड, अंबरनाथ व उल्हासनगर या सात तालुक्यांतील क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे.
या जिल्हा नियोजन बैठकीला राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, मुंबई विभागीय सचिव अंकुर आहेर व ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद वाघमोडे हे उपस्थित राहणार आहेत.
बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी ठाणे महानगरपालिका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रणजित शिंदे व सचिव एकनाथ पवळे व सर्व कार्यकारणी टीम यांनी क्रीडा समन्वयक मनपा ठाणे शंकर बरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारली आहे. या बैठकीत, महानगरपालिका व तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांचेकडून क्रीडा व शारीरिक शिक्षण या विषयाचा अभ्यासक्रम, क्रीडा शिक्षक भरती, शालेय क्रीडा स्पर्धा या विषयांच्या अनुषंगाने शरदचंद्र धारुरकर हे मार्गदर्शन करणार आहेत, असे जिल्हा अध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका व तालुक्यातील कार्यकारिणी प्रतिनिधींनी एकजुटीने या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन महासंघाचे विभागीय सचिव अंकुर आहेर व ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी केले आहे.