क्रीडा क्षेत्रात युवकांसाठी अनेक संधी उपलब्ध ः सुमेध तरोडकर

  • By admin
  • April 1, 2025
  • 0
  • 34 Views
Spread the love

जेईएस महाविद्यालयात क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयावरील राष्ट्रीय परिषदेचा समारोप 

जालना ः युवा खेळाडूंनी आपल्या आवडीच्या खेळात नियमित सराव व कठोर परिश्रम घेऊन खेळल्यास निश्चितच यात करिअर करता येऊ शकते, कारण पुढे भारतात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मागणी येणार आहे. शासकीय व खासगी क्षेत्रात रोजगाराची संधी खेळाच्या माध्यमातून मिळत असल्याचे प्रतिपादन जेईएस महाविद्यालय जालना येथे आयोजित क्रीडा व शारीरिक शिक्षण आंतरशाखीय संबंध या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक संचालक सुमेध तरोडकर यांनी केले.

जेईएस महाविद्यालयाचा क्रीडा विभाग व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच भारतीय शारीरिक शिक्षण संस्था नवी दिल्ली (पेफी) यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय क्रीडा व शारीरिक शिक्षण आंतरशाखीय संबंध बाबत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री हे होते. तसेच प्रमुख निमंत्रित म्हणून छत्रपती संभाजीनगर साई क्रीडा केंद्राचे सहाय्यक संचालक सुमेध तरोडकर हे उपस्थित होते, व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ महावीर सदावर्ते, क्रीडा विभाग प्रमुख डॉ हेमंत वर्मा, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ राजेंद्र सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.        

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख डॉ हेमंत वर्मा यांनी केले आणि  जेईएस महाविद्यालयात तिसरी राष्ट्रीय परिषद व चर्चासत्र असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत जेईएस महाविद्यालयाच्या खेळाडूंनी अनेक खेळांमध्ये राष्ट्रीय व राज्य स्तरावर नावलौकिक कमावला आहे. महाविद्यालयाचा क्रीडा विभाग त्यांना नेहमीच प्रोत्साहित करत असतो. दरवर्षी आर्चरी या खेळामध्ये महाविद्यालयाची कामगिरी उल्लेखनीय असते असेही डॉ हेमंत वर्मा यांनी सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की, युवकांनी छोट्या छोट्या खेळांपासून सुरुवात करावी, आपला कल व आवड ओळखून पुढे त्या खेळाच्या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करावे. युवा खेळाडूंनी कठोर परिश्रम घेतल्यास व नियमित सराव केल्यास निश्चितच यश प्राप्त होते. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांचे उदाहरण त्यांनी सांगितले . सुरुवातीला ते फुटबॉल खेळत होते नंतर क्रिकेटकडे वळले, या खेळाची सुरुवात त्याने कठोर परिश्रम करून केली असून, चांगल्या प्रकारे खेळून, पुढे तो भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकला ,त्याने भारताला विशेष असा बहुमान मिळून दिला.आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट क्षेत्रात स्वतःचे नाव कमावून देशालाही नावलौकिक प्राप्त करून दिला.महाविद्यालयाचा गौरवशाली इतिहास व परंपरा त्यांनी सांगितली. या महाविद्यालयात अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होऊन गेल्याचे सांगून, यापुढेही दरवर्षी शारीरिक शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय क्रीडा व शारीरिक शिक्षण परिषदेचे आयोजन केले जाईल, असेही डॉ गणेश अग्निहोत्री यांनी सांगितले.    

या परिषदेत एकूण ८२ शोधनिबंध प्राप्त झाले व १५ पेपर वाचन करण्यात आले. शोधनिबंध सादर करणाऱ्या खेळाडू व प्राध्यापकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. परिषदेचे स्वरूप हायब्रीड असल्याने ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने पेपर वाचन करण्यात आले. यात उत्कृष्ठ शोध निबंध वाचन पुरस्कार आणि उत्कृष्ट पोस्टर प्रेझेंटेशन पुरस्कार शोधक व विद्यार्थी मुले व मुली यांना जाहीर करण्यात आले व महाविद्यालयाचा वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या राष्ट्रीय परिषदेत डॉ चेतनकुमार भागवत (जालना), डॉ जानकी कुर्तडीकर (अंबड), डॉ कोटरा बालयोगी (नागलँड), अंजली तळणीकर (पुणे) यांनी उत्कृष्ट शोध पेपर सादर करुन पुरस्कार संपादन केला. तसेच बेस्ट पोस्टर प्रेझेंटेशन पुरस्कार भवानी कोत्तुल्लू (जालना), बेस्ट पेपर रीडर पुरस्कार पवन नरवडे, साक्षी जऱ्हाड या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आला. 

या राष्ट्रीय चर्चासत्रात देशातील विविध संशोधक विद्यार्थी आणि शिक्षकांनी भाग घेतला. समारोप कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय परिषदेत सहभागी खेळाडू, प्राध्यापक, क्रीडा शिक्षक, योगा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेईएस महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ हेमंत वर्मा यांनी केले, महाविद्यालयाचे माजी खेळाडू प्रा सुमित आम्लेकर यांनी आभार मानले. ही राष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ किशोर बिरकायलू, डॉ वसंत पवार, डॉ मनोज माहेर, डॉ चौबे, डॉ शेवाळे, डॉ शिल्पा कावणा, प्रा राहुल सारस्वत, डॉ प्रवीण चंदनशिवे, डॉ बी जे  श्रीरामे, सौंदर, क्षीरसागर, विलास बोधले, धर्मेंद्र आंबट, साईनाथ, राजेश दौड, बबलू टेकाळे, गोविंद साखरे, घनश्याम मोदानी, वसतिगृहाचे विद्यार्थी, महाविद्यालयातील क्रीडा विभागाचे खेळाडू आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *