
मुंबईतील कबड्डी खेळाडूंसाठी विमा कवच देण्याचा प्रयत्न ः आमदार महेश सावंत
मुंबई: कबड्डी खेळाडूंच्या उतारवयातील सुरक्षिततेसाठी ओम् कबड्डी प्रबोधिनीने मदत निधी उभारावा असे प्रतिपादन आमदार सचिनभाऊ अहिर यांनी केले.
ओम् कबड्डी प्रबोधिनीच्या २२व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दादर पश्चिम येथील कित्ते भंडारी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कबड्डी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रबोधिनीने या निधीसाठी पुढाकार घ्यावा. यासाठी माझ्याकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील कबड्डीपटूंना विमा कवच मिळणार
याच सोहळ्यात नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या भाषणात मुंबईतील विद्यमान कबड्डी खेळाडूंसाठी विमा योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सर्व आमदारांना सहकार्याची विनंती करेन असे आश्वासन दिले.
ज्येष्ठ खेळाडूंचा गौरव
ओम् कबड्डी प्रबोधिनीने आपल्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ कबड्डीपटू भारती देसाई व गोपाळ लिंग (होसमणी) यांचा त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल सन्मान केला. तसेच महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ प्राप्त मार्गदर्शक अनिल घाटे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
सचिन कदम यांचा सत्कार
ज्येष्ठ कबड्डीपटू मुरारी कदम यांचे चिरंजीव सचिन मुरारी कदम यांची भोईवाडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी आमदार सचिनभाऊ अहिर, महेश सावंत, माजी महापौर महादेव देवळे, किशोरीताई पेडणेकर, तसेच भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन मुरारी कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे चित्रा नाबर-केळकर, शैला रायकर-पेडणेकर, विजया शेलार, संजय सरदेसाई, मनोहर साळवी, भार्गव कदम, तसेच राष्ट्रीय कबड्डीपटू आणि क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.