
नागपूर (सतीश भालेराव) : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि जेएमएफसी यांनी घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२२ चा निकाल घोषित झाला आहे. वानाडोंगरी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या राजीवनगर या वसाहतीमध्ये राहणारी किरण संतप्रसाद वर्मा ही महाराष्ट्रात दहावी आली आहे.
स्क्राफ्टचा व्यवसाय करणाऱ्या संतप्रसाद वर्मा यांची मुलगी किरण ही लवकरच न्यायाधीश बनणार आहे. त्यामुळे किरण आणि तिच्या कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एकूण ३४३ उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड झाली. २९ मार्चला शनिवारी अंतिम निकाल जाहीर झाला असून ११४ जणांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पदासाठी निवड करण्यात आली आहे. ११४ उमेदवारामध्ये किरण वर्मा हिने दहावा क्रमांक प्राप्त केला आहे. किरण ही सिव्हिल लाइन, नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर लाॕ-काॕलेज मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. नंतर तिने पुण्यातील गणेश सिरसाट अॕकॕडमीमध्ये प्रवेश घेतला.
वडिलांचे स्वप्न पूर्ण केले
एकदा काही कामानिमित्त मी आई-बाबांसोबत न्यायालयात गेले होती. तेव्हा तेथील वकिलांना पाहुन माझे बाबा प्रभावित झाले व माझ्याकडे पाहुन म्हणाले की, मी माझ्या मुलीला वकील बनवणार. माझ्या वडिलांनी फक्त वकील बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. पण मी आज वकिलांची न्यायाधीश झाले आणि माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले अशा शब्दांत किरण वर्मा हिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या यशाचे श्रेय तिने आई-बाबा व अॕड गणेश सिरसाट यांना दिले.
किरणला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. दुसऱ्या क्रमांकाची राधिका ही इंजिनियर असून तिसरी रिंकी ही एमपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे. किरणचा निकाल जाहीर होताच परिसरातील नागरिकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. तसेच वानाडोंगरी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ता, माजी पंचायत समिती सदस्या रेखा वर्मा, दिलीप गुप्ता, नंदकिशोर वर्मा, ज्योती पारसकर व चंदन वर्मा, इंगळे गुरुजी,गजानन ढाकूलकर यांनी घरी जाऊन अभिनंदन केले.