
मुंबई ः बोधगया (बिहार) येथे झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या वेदांत शिवाजी घाडगे याने शानदार कामगिरी बजावत विजेतेपद पटकावले. वेदांत याने नऊपैकी नऊ गुणांची कमाई करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
बारावी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा बिलो १७०० गटाची होती. या स्पर्धेत वेदांत घाडगे याने वर्चस्व गाजवले. नऊपैकी नऊ डाव जिंकून वेदांत याने विजेतेपद संपादन केले. या कामगिरीमुळे वेदांतची एशियन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच वेदांत घाडगे याला कँडिडेट मास्टर हा किताब ऑल इंडिया चेस फेडरेशनच्या वतीने प्रदान करण्यात आला. तसेच भव्य ट्रॉफी व रोख पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करुन वेदांतला सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत वेदांत घाडगे याने इशान सात्वत (बिहार), गुणासेलवरम (आरबीआय), साकेत कुमार (बिहार), वीर पटेल (गुजरात), मुत्थू कन्नन (तामिळनाडू), जयकिशन जयस्वाल (उत्तर प्रदेश), अव्यय शर्मा (बिहार), प्रशांतकुमार सिंग (बिहार) या खेळाडूंचा पराभव करुन विजेतेपद पटकावले.
बिहार येथील वास्तू विहारचे सीईओ विनय तिवारी, ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, ऑल इंडिया चेस फेडरेशनचे खजिनदार धर्मेंद्र कुमार, फिडे वर्ल्ड चेस फेडरेशनचे सदस्य रथीनाम अनंतराम यांनी वेदांत घाडगे याला ट्रॉफी व रोख पारितोषिक प्रदान करुन सन्मानित केले.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, जालना जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष दयानंद भक्त, वेदांतचे प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू सतीश ठाकूर व प्रशिक्षक कृष्णा ठाकूर, जालना बुद्धिबळ संघाचे सचिव प्रा. रत्नाकर कुलकर्णी, सदस्य प्रा. श्याम काबुलीवाले, प्रा. गजानन जगताप यांनी वेदांतचे अभिनंदन करून पुढील एशियन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.