
सामनावीर नयन वाणीचे सामन्यात दहा बळी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १९ दोन दिवसीय क्रिकेट लीग स्पर्धेत जालना संघाने सिंधुदुर्ग संघावर १२८ धावांनी शानदार विजय साकारला. या सामन्यात नयन वाणी याने सामनावीर किताब संपादन केला.

सीपी क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. जालना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत पहिल्या डावात ५२.४ षटकात सर्वबाद २०० धावा काढल्या. त्यानंतर सिंधुदुर्ग संघाला ५०.५ षटकात १७५ धावांवर रोखून जालना संघाने पहिल्या डावात २५ धावांची आघाडी घेतली. जालना संघाने दुसऱया डावात ४२.३ षटके फलंदाजी करत नऊ बाद १७९ धावसंख्येवर डाव घोषित केला. सिंधुदुर्ग संघाचा दुसरा डाव १७.२ षटकात अवघ्या ७६ धावांत गडगडला. जालना संघाने १२८ धावांनी सामना जिंकला.

या सामन्यात शिवम शिंदे याने १२ चौकारांसह ६२ धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. वेदांत देव्हाडे याने ४७ धावांचे योगदान दिले. त्याने एक षटकार व पाच चौकार मारले. इशान कुबाडे याने आठ चौकारांसह ४६ धावा फटकावल्या. गोलंदाजीत नयन वाणी याने १६ धावांत सहा विकेट घेऊन संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. यश पार्सेकर याने ४५ धावांत चार गडी बाद केले. नयन वाणी याने ४३ धावांत चार विकेट घेतल्या. नयन वाणी याने सामन्यात दहा विकेट घेण्याचा पराक्रम केला. नयनच्या शानदार स्पेलमुळे जालना संघ निर्णायक विजय नोंदवण्यात यशस्वी ठरला. ओंकार वाघ याने गोलंदाजीत चमकदार कामगिरी बजावली. त्याने सामन्यात सहा बळी घेतले आहेत. या संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक राजू काणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.