
लखनौ संघावर आठ विकेट राखून मात, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यरची दमदार फलंदाजी
लखनौ : प्रभसिमरन सिंग (६९) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (नाबाद ५२) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर पंजाब किंग्ज संघाने सलग दुसरा विजय नोंदवला. पंजाबने १६.२ षटकात दोन बाद १७७ धावा फटकावत विजय साकारला. या दणदणीत विजयासह पंजाबने गुणतालिकेतील आपली स्थिती भक्कम केली.
पंजाब किंग्ज संघासमोर विजयासाठी १७२ धावांचे आव्हान होते. प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या सलामी जोडीने डावाची सुरुवात आक्रमक केली. परंतु, प्रियांश केवळ ८ धावा काढून बाद झाला. दिग्वेश राठी याने पंजाबला पहिला धक्का दिला तेव्हा धावफलकावर २६ धावा होत्या. त्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करुन संघाचा विजय निश्चित केला.

प्रभसिमरन सिंग याने ३४ चेंडूत ६९ धावांची वादळी खेळी केली. आपल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीत त्याने तीन उत्तुंग षटकार व नऊ चौकार मारले. दिग्वेश राठी याला उत्तुंग षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. रवी बिश्नोई याने त्याचा सुरेख झेल टिपला. प्रभसिमरन याने स्फोटक फलंदाजी करत सामना एकतर्फी बनवला.
त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर व नेहल वधेरा या जोडीने स्फोटक फलंदाजी करत १७व्या षटकात संघाला विजय मिळवून दिला. अय्यर याने पुन्हा धमाकेदार अर्धशतक ठोकताना ३० चेंडूत नाबाद ५२ धावा काढल्या. अय्यरने विजयी षटकार ठोकत स्वत:चे अर्धशतक साजरे केले. त्याने चार टोलेजंग षटकार व तीन चौकार मारले. नेहल वधेरा याने २५ चेंडूत नाबाद ४३ धावा काढल्या. त्याने चार उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. दिग्वेश राठी याने ३० धावांत दोन गडी बाद केले.
ऋषभ पंतचा फ्लॉप शो सुरूच
प्रथम खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स संघाने १७१ धावसंख्या उभारली. एकाना स्टेडियमवर एक उच्च धावसंख्या असलेला सामना खेळला जाण्याची अपेक्षा होती, परंतु पंजाब किंग्जच्या घातक गोलंदाजीसमोर लखनौ संघाची फलंदाजी कोसळली. श्रेयस अय्यरने उत्तम नेतृत्व केले आणि गोलंदाजांचा चांगला वापर केला ज्यामुळे लखनौचे फलंदाज मोठ्या भागीदारी रचू शकले नाहीत. पंजाबकडून अर्शदीप सिंग याने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.
या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय बरोबर ठरला कारण लखनौने ३५ धावांवर ३ विकेट गमावल्या. मोठ्या भागीदारीअभावी लखनौला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. त्यानंतर, निकोलस पूरन आणि आयुष बदोनी यांच्यात ५४ धावांची महत्त्वाची भागीदारी झाली, परंतु ३० चेंडूत ४४ धावा करून पूरन बाद झाला.
ऋषभ पंतचा फ्लॉप शो, मिलरही अपयशी
आयपीएल २०२५ मध्ये एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंतचा फ्लॉप शो सुरूच आहे. हंगामाच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याला आपले खातेही उघडता आले नाही. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त १५ धावा आल्या. आता पुन्हा एकदा पंजाब किंग्जविरुद्धच्या लढतीत त्याची बॅट शांत राहिली आहे. पंतला ग्लेन मॅक्सवेलने २ धावांवर बाद केले. संघाचा अनुभवी फिनिशर फलंदाज डेव्हिड मिलर देखील अपयशी ठरला आणि फक्त १९ धावा करून बाद झाला.
पंजाबची दमदार गोलंदाजीपंजाब किंग्ज संघाकडून दमदार गोलंदाजी होती. अर्शदीप सिंग संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता, त्याने एकूण ३ फलंदाजांना बाद केले. या सामन्यात पंजाब किंग्जकडून लॉकी फर्ग्युसनने पदार्पण केले, ज्याला एक विकेट घेण्यात यश आले. त्याच्याशिवाय ग्लेन मॅक्सवेल, मार्को जानसेन आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.