
रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रसिजन क्रिकेट ः प्रशांत सुरवसे सामनावीर
सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूटच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रसिजन क्रिकेट स्पर्धेत अंबर क्रिकेट क्लबने सिंधी इलेव्हन क्लबचा ५६ धावांनी पराभव करीत विजयी सलामी दिली. शानदार अर्धशतक झळकाविणारा प्रशांत सुरवसे सामन्याचा मानकरी ठरला.

रेल्वेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात या स्पर्धेचे उद्घाटन रेल्वेचे स्पोर्ट्स ऑफिसर आदित्य त्रिपाठी यांच्या हस्ते झाले. यावेळी रेल्वेचे अधिकारी सचिन गणेर, सीआरएमएसचे उल्हास बागेवाडी, एनआरएमयूचे एस एल कांबळे, सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु, वरिष्ठ क्रिकेटपटू के टी पवार, राजेंद्र गोटे, रेल्वे इन्स्टिट्यूटचे सेक्रेटरी किशोर पिल्ले, खजिनदार विक्रांत पवार, सेक्रेटरी ऋषिकेश यरगल, रेल्वेचे वरिष्ठ क्रिकेटपटू वासुदेव दोरनाल, गौतम बनसोडे, अंबादास तोरा, लियाकत शेख, प्रवीण देशेट्टी, सुदेश मालप व अतुल बांदीवाडीकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजा पटेल यांनी केले. सलामीच्या सामन्यासाठी अशोक डोंबाळे व किरण डिग्गे यांनी पंच तर सचिन गायकवाड यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले.
संक्षिप्त धावफलक ः अंबर क्लब : २० षटकांत ५ बाद १९१ (प्रशांत सूरवसे ६७, जुबेर तांबोळी ३८, विनायक बेऊर १९, महेंद्र ढवान १८, सचिन वांगीकर १८, अमित गोगिया, राजीव आहुजा, सोनू केस्वानी व विजय कुकरेजा प्रत्येकी एक बळी) विजयी विरुद्ध सिंधी इलेव्हन : २० षटकांत ६ बाद १३५ (राहुल वाडिया ४४, राजीव आहुजा २७, दिनेश वाडिया १७, आनंद बबलेश्वर २ बळी, सुधांशू भालेराव, सचिन वांगीकर, तुषार म्हेत्रे व विनायक बेऊर प्रत्येकी एक बळी).