राज्य कॅरम स्पर्धेत पंकज पवार, काजल कुमारी विजेते

  • By admin
  • April 2, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

मुंबई: रोटरी क्लब ऑफ पार्लेश्वर मुंबई आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, जुहू यांच्या सहयोगाने आयोजित उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटात पंकज पवार आणि महिला एकेरी गटात काजल कुमारी यांनी शानदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या पंकज पवारने दोन वेळा विश्वचषक विजेता आणि तीन वेळा राष्ट्रीय विजेता प्रशांत मोरे याला अटीतटीच्या लढतीत १६-२५, २५-१४, २५-२० अशा रोमांचक फरकाने पराभूत केले. पहिला सेट गमावल्यावर दुसऱ्या सेटमध्ये व्हाईट स्लॅम करत पंकजने सामन्यात पुनरागमन केले. अंतिम सेटमध्येही पिछाडीवर असताना सातव्या बोर्डात १० गुणांची कमाई करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

अंतिम फेरीपूर्वी उपांत्य फेरीत पंकजने अभिजित त्रिपणकरला २०-१९, १७-४ असे पराभूत केले. प्रशांत मोरेने सिद्धांत वाडवलकरला २५-२२, १४-२२, २२-१२ असे नमवले.

काजल कुमारीचे प्रभावी पुनरागमन
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या काजल कुमारीने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला ६-२३, २४-६, २१-१६ अशा फरकाने पराभूत केले. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये काजलने शेवटच्या बोर्डात ब्रेकचा फायदा घेत सामन्यावर नियंत्रण मिळवले.

अंतिम फेरीपूर्वी काजलने समृद्धी घाडीगावकरवर २४-५, १६-१९, २५-४ असा विजय मिळवला. आकांक्षा कदमने प्राजक्ता नारायणकरला २५-१९, २२-१८ असे पराभूत केले.

तृतीय स्थानासाठी झालेल्या लढतीत पुरुष गटात सिद्धांत वाडवलकरने अभिजित त्रिपणकरला १०-२४, १६-१५, २५-१९ असे पराभूत केले. महिला गटात समृद्धी घाडीगावकरने प्राजक्ता नारायणकरला २५-१४, २२-२१ असे पराभूत केले.

विजेत्यांचा गौरव
विजेत्यांचा सत्कार रोटरी क्लब ३१४१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ मनीष मोटवानी, सचिव भालचंद्र बर्वे, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे डायरेक्टर नागेश पिंगे, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे विश्वस्त मकरंद येडुलकर, रोटरी क्लब पार्लेश्वर मुंबईचे अध्यक्ष अविनाश मिश्रा, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. विजेत्यांना रोख २५ हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *