
कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृती प्रतिष्ठानने घेतली दखल
नागपूर (सतीश भालेराव) : महाराष्ट्राच्या उपराजधानीत असंख्य गुणवाण खेळाडू आहेत. मात्र कधी आर्थिक परिस्थिती अथवा पायाभूत सुविधांच्या अभावी ते ध्येय गाठू शकत नाही. अशीच एक गुणवान खेळाडू इस्थर कुजुर आहे. अपघातात एक पाय गमवावा लागल्यानंतर इस्थर हिने जिद्दीने पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. पॅरा ऑलिम्पिक ट्रायलसाठी जाण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
फुटबॉल, हॉकी, बुद्धिबळ तब्बल पाच खेळांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करणारी इस्थर कुजुर हिला नोव्हेबर २०२० एका अपघातात स्वतःचा पाय गमवावा लागला. अपघात बिकट होता, वडील सोबत होते. ती नेहमीसाठी एका पायाने दिव्यांग झाली. मैदानावर सुसाट वेगाने धावणारी इस्थर आर्टिफिशल पायाने ती पुन्हा मैदानात उतरली. ती आता तिरंदाज खेळात स्वतःला सिद्ध करण्यासाठी पॅरा ऑलिम्पिकच्या ट्रायलसाठी जात आहे. झोपडपट्टीत राहणारी इस्थर हिची आर्थिक परिस्थिती कमकुवत असली तरी उच्चशिक्षित आहे. खेळावर तिचे नितांत प्रेम आहे. त्यावर तिचे संशोधनात्मक प्रबंधाचे काम सुरू आहे.
इस्थर हिची व्यथा प्रसिद्धी माध्यमांनी मांडल्या. फक्त अभिनंदनाचे फोन आल्याचे दुर्गादास रक्षक सृति प्रतिष्ठानचे विश्वस्थ ज्ञानेश्वर रक्षक आणि बालसदनचे विश्वस्थ प्रशांत हाडके यांना कळले. आर्थिक नियोजनाचे काय ? हा सर्वात मोठा प्रश्न होता. ज्ञानेश्वर रक्षक आणि प्रशांत हाडके यांच्या पुढाकाराने २५ हजार रूपये आर्थिक मदत अनंता रक्षक यांच्याकडून एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आली.
नागपूरच्या अप्पर आयुक्त आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे (चवरे) यांच्या हस्ते ही आर्थिक मदत इस्थर हिला देण्यात आली. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रतीमा भेट देऊन तिचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानेश्वर रक्षक, प्रशांत हाडके, विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ राजू हिवसे, डी डी गोंडाणे यांची उपस्थिती होती. याचवेळी भारतीय सैन्यातील माजी सैनिक देविदास लाखे यांनी पण इस्थर हिला आर्थिक मदत दिली. सर्वांनी तिच्या ध्येयाला सलाम करीत भारताचे नाव खेळामध्ये रोशन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.