
जळगाव ः राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ निवड चाचणीला सुरुवात झाली. या निवड चाचणीत सहभागी होण्याची संधी ५३ युवा खेळाडूंना लाभली.
राज्यस्तरीय आंतर जिल्हा २० वर्षातील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा ११ एप्रिलपासून लोणावळा येथे सुरू होत आहे. त्यासाठी जळगाव जिल्हा फुटबॉल संघाची निवड चाचणीला सुरुवात झाली असून या निवड चाचणीत ५३ युवा खेळाडूंचा सहभाग होता. विशेष करून यात जळगाव, भुसावळ, रावेर, चोपडा, अमळनेर, पारोळा येथील युवा खेळाडूंचा देखील समावेश आहे.
ज्या फुटबॉल खेळाडूंनी अद्याप निवड चाचणीसाठी सीआरएसची नोंदणी केली नसेल त्यांनी ३ व ४ एप्रिलला सीआरएस करून निवड चाचणीला हजर राहू शकतात. अंतिम संघ निवड ८ तारखेला होणार असल्याने जो कोणी खेळाडू काही कारणास्तव नाव नोंदवले नसेल त्यांच्यासाठी संघटनेने एक संधी पुनश्च दिलेली आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील युवा फुटबॉल खेळाडूंनी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे सकाळी ८ वाजता उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी केले आहे.