
कोल्हापूर ः कोल्हापूरच्या संदेश दत्तात्रय कुरळे याने राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावले. संदेशचे हे एका महिन्यातील सलग तिसरे विजेतेपद आहे हे विशेष.
कोल्हापूरच्या संदेश कुरळे याने पाचगणी (महाबळेश्वर) येथे २.५ लाख एआयटीए राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत शशांक तीर्थ (हैदराबाद) समवेत पुरुष दुहेरी ओपन गटात विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत पहिल्या फेरीत संदेश व शशांक याने हरिश्चित ढाकणे, सूर्या काकडे या जोडीचा ६-२, ६-४ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत संदेश व शशांक जोडीने ओमकार शिंदे व अनुज तशिलदार यांचा ६-२, ६-२ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीत संदेश व शशांक जोडीने सागर कुमार व मोक्ष पुरी या जोडीवर ७-६ (४), ६-४ असा विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात ओम वर्मा व अनमोल नागपुरे या जोडीचा ७-५, ६-४ असा पराभव करुन संदेश कुरळे व शशांक तीर्थ या जोडीने विजेतेपद पटकावले.
संदेश दत्तात्रय कुरळे हा कोल्हापूरचा असून अर्शद देसाई टेनिस अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहे. त्याला प्रशिक्षक मनाल देसाई व अर्शद देसाई यांचे मार्गदर्शन लाभत आहे.