राज्य क्रिकेट स्पर्धेत एमआयटी संघाला विजेतेपद 

  • By admin
  • April 2, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

स्वप्नील राठोड, विशाल राठोडची लक्षवेधक कामगिरी 

छत्रपती संभाजीनगर ः एमआयटी छत्रपती संभाजीनगर क्रिकेट संघाने आंतर इंजिनिअरिंग राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावत विजेतेपद पटकावले आहे. 

एमआयटी छत्रपती संभाजीनगर संघाने आरंभ २५ शेगाव आंतर इंजिनिअरिंग राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी नोंदवली. अंतिम सामन्यात एमआयटी संघाने शेगावच्या एसएसजीएमसीई संघाचा पराभव केला आणि विजेतेपद संपादन केले. 

या रोमांचक अंतिम सामन्यात एमआयटी छत्रपती संभाजीनगर संघाने २० षटकात आठ बाद १५८ धावसंख्य उभारली. विशाल राठोड याने ३७ चेंडूत ४७ धावांची वेगवान खेळी केली. त्याने चार चौकार व तीन उत्तुंग षटकार ठोकले. स्वप्नील राठोड याने १२ चेंडूत ३३ धावांची स्फोटक खेळी केली. त्याने चार चौकार व दोन षटकार मारले. 

एमआयटी संघाच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत एसएसजीएमसीई शेगाव संघाला १५.१ षटकात अवघ्या १०१ धावांवर रोखून संघाला विजेतेपद मिळवून दिले. स्वप्नील राठोड याने २४ धावांत तीन विकेट घेऊन विजेतेपदात मोलाचा वाटा उचलला. विशाल राठोड याने १९ धावांत एक गडी बाद केला. अभिजीत खोंडकर व आशिष पवार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सार्थक सुरडकर याने ८ धावांत दोन बळी टिपले. 

शानदार अष्टपैलू कामगिरी बजावल्याबद्दल स्वप्नील राठोड याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशाल राठोड याने स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. त्यामुळे विशाल हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरला. 

विजेतेपद मिळवणाऱ्या एमआयटी क्रिकेट संघाचे एमआयटी ग्रुपचे महासंचालक मुनीश शर्मा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ निलेश पाटील, सहनिबंधक प्रा मकरंद वैष्णव आणि विद्यार्थी विकास अधिष्ठाता डॉ अमित रावते यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या संघाला क्रीडा संचालक डॉ प्रसाद कुलकर्णी, क्रिकेट प्रशिक्षक प्रीतेश चार्ल्स व विलास त्रिभुवन यांनी मार्गदर्शन केले आहे. 

एमआयटी छत्रपती संभाजीनगर संघ 

आशिष पवार (कर्णधार), विशाल राठोड, सागर राठोड, स्वप्नील राठोड, रुकेश यादव, अभिजीत खोंडकर, अनिश पुनारी, वरद नागपूरकर, सार्थक सुरडकर, दुष्यंत इंगळे, रितेश देशमुख, गणेश गाडेकर, शिवम बडगुजर, साहिल दवांडे, दीपक भावले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *