दमदार विजयासह महाराष्ट्र संघाची आगेकूच

  • By admin
  • April 2, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा ः कोल्हापूर व विदर्भ संघ विजयी
 
पुरी (ओडिशा) ः पुरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ५७व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी साखळी स्पर्धेतील सर्व सामने जिंकत गटात अव्वल स्थान पटकाविले व अजेय कामगिरी करत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याचबरोबर कोल्हापूर आणि विदर्भ या संघांनीही पुढील फेरीत स्थान निश्चित केले आहे.

 साखळी फेरीत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने दादरा आणि नगर हवेली संघावर ५४-२० असा एक डाव राखून ३४ गुणांनी विजय मिळवला. यात दादरा हवेलीच्या आक्रमकांना महाराष्ट्राच्या एकाही खेळाडूला बाद करून गुण मिळविता आला नाही. महाराष्ट्राचे सर्व खेळाडू संरक्षण करून निवृत्त झाले. यात प्रतिक वाईकरने (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), अनिकेत चेंडवणकर (१.३० मि. संरक्षण व ४ गुण) व ऋषिकेश मुर्चावडे (१.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. निहार दुबळे व रविकिरण केंचे यांनी आपल्या आक्रमणात प्रत्येकी ६ गडी बाद केले.

शेवटच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने तामिळनाडू संघास ३३-२४ असे ९ गुण व ४.५९ मिनिटे राखून नमविले. यात मिलिंद चवरेकरने आपल्या धारदार आक्रमणात ८ गडी टिपले. शुभम थोरात (२.३० मि. संरक्षण व २ गुण) व प्रतिक वाईकर (१.२०, १.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. तामिळनाडू संघाकडून व्ही शुभ्रमणी (१ मि. संरक्षण व ६ गुण) याची एकाकी लढत अपुरी पडली.

 महाराष्ट्र महिला संघाची विजयी मालिका
महिला गटात महाराष्ट्राच्या संघाने जम्मू-काश्मीर संघाचा ५३-१० असा एक डाव राखून ४३ गुणांनी पराभव केला. या सामन्यात सुद्धा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जम्मू काश्मीरला खेळाडू बाद करून एकही गुण मिळवू दिला नाही. महाराष्ट्राचे सर्व खेळाडू संरक्षण करून निवृत्त झाले. यात सुहानी धोत्रे हिने (२.३० मि. संरक्षण व ६ गुण), संपदा मोरे (२.५० मि. संरक्षण व ३ गुण) मनीष पेडेर (१.४० मि. संरक्षण व ६ गुण) व पायल मोरे (१.४० मि. नाबाद संरक्षण व २ गुण) यांनी अष्टपैलू कामगिरी केली.

दुसऱ्या सामन्यात त्यांनी पंजाबवर ३२-११ असा २१ गुणांनी पराभव केला. प्रियांका इंगळे (१.३० मि. संरक्षण व ८ गुण), संध्या सुरवसे (३.१५ मि. संरक्षण व ४ गुण) व रेश्मा राठोड (१.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी संघाच्या विजयात अष्टपैलू खेळी केली. पंजाबकडून राणी (१.३५ मि. संरक्षण ) व नीता देवी (४ गुण) यांची लढत अपुरी ठरली.

महिलांच्या अन्य एका सामन्यात विदर्भ संघाने मध्य भारतवर ३७-२० असा विजय मिळवत पुढील फेरी गाठली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *